आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Fake Notes Printing Press In Akola

अकोल्यात बनावट नोटांचा छापखानाच, धागेदोरे महाराष्‍ट्रा बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - काल, गुरूवारी छापा घालून बनावट नोटा जप्त करणार्‍या अकोला पोलिसांना येथे बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच आढळून आला आहे. वाशिम बायपास येथील गंगानगर-2 मध्ये गुरुवारी रात्री पोलिसांनी दीपक पवार याच्या घरातून बनावट नोटा, नोटा बनवण्याचे यंत्र आणि इतर साहित्य छापा टाकून हस्तगत केले. या नोटा अकोल्यातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही चलनात आणल्या जात होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या दिशेने पोलिस शोध घेत आहेत.


गंगानगर येथील दीपक पवार याच्या घरात बनावट नोटा बनवण्याचा गोरखधंदा सुरू आहे तसेच या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांनी बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांच्याकडे कारवाईसाठी टीमचे नेतृत्व दिले. त्यांनी गुरुवारी गंगानगर येथील दीपक पवार याच्या घरात सायंकाळी 5 वाजता छापा टाकला. या वेळी त्याच्या घरातील 14 खोल्यांमधून पोलिसांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या चार लाख 78 हजार रुपयांच्या बनावट नोटा, दोन लाख 36 हजार 900 रुपयांच्या खर्‍या नोटा, प्रिंटर, स्कॅनर, नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद, शाई, लॅपटॉप, नोटा कापण्यासाठी कटर, नोंदवही, कोरे धनादेश, मुद्रांक पेपर जप्त केले. कारवाईच्या वेळी पोलिसांना त्याच्या घरासमोर दोन चारचाकी आणि सहा दुचाकी वाहने आढळली. या वेळी घरामधून दीपक पवारचे नातेवाईक मनोज पवार आणि सूरज गोयल, अशा पवार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दीपक पवार पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी मनोज पवार, सूरज गोयल, अशा पवार, तारा पवार, सीता घंडोरे, ज्योती जावळे, संगीता जावळे यांच्या विरोधात विविध कलमान्वये व 34 भादंविचे सहकलम 39 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 व वटहुकूमप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. याअगोदरही त्याच्यावर शहर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष माकोडे, पोलिस उपनिरीक्षक डी. एन. फळ, राजकुमार मिर्शा, दिनकर धुरंदर, नंदकिशोर टिकार, राहुल तायडे यांनी केली आहे.


तीन वर्षांपूर्वी पवार निलंबित: दीपक पवार हा खामगाव येथील पशुचिकित्सक कार्यालयात चतुर्थ र्शेणी कर्मचारी आहे. तो तीन वर्षांपासून गैरव्यवहाराच्या प्रकरणात निलंबित आहे. सफाई कामगार आणि मोठा बंगला आणि त्याच्याकडे येणार्‍या-जाणार्‍यांची वर्दळ यावरून नागरिक नेहमीच आश्चर्य व्यक्त करीत होते, तर रात्रीच्या वेळी अनेक जण चारचाकी वाहनांनी येत आहे, अशी माहिती शेजार्‍यांनी दिली.


कारवाई बाळापूर एसडीपीओची नाही, तर जिल्हा पोलिसांचीच :
बाळापूर एसडीपीओ गणेश गावडे हे 15 दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. त्यांनी कारवाई केली, मात्र शहर पोलिसांनी आजपर्यंत कारवाई केली नाही, याविषयी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांना विचारले असता, ‘माझ्या परवानगीशिवाय कारवाईच होऊ शकत नाही, मी गावडे यांच्याकडे नेतृत्व दिले. कारवाई ही जिल्हा पोलिसांचीच आहे. गावडेंची नाही’, असे ते म्हणाले.


कारवाईत मिळाले सावकारीचे पुरावे: दीपक पवार हा सावकारीचा धंदा करायचा हे त्याच्या घरात आढळलेल्या कागदपत्रांवरून तसेच घरातील नोंदवहय़ा, कोरे बाँडपेपर इत्यादीवरून दिसून येते. सावकारीच्या पुराव्यावरून पोलिसांनी त्याच्यावर सावकारी कायद्यानुसारसुद्धा गुन्हे नोंदवले.


घरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे : घरी कोण-कोण येत आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये आणि घराच्या चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या कॅमेर्‍यांद्वारे घरावर पाळत ठेवली जात होती. हे कॅमेरे आणि त्याचे सर्व्हर पोलिसांनी जप्त केले असून, त्याच्याकडे कोण, केव्हा, कशासाठी येऊन गेले, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचे घरही पोलिसांनी सील केले आहे.