आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप: आरोग्य सेवेचे जिल्ह्यात तीनतेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अस्थायी आणि बंधपत्रित परिचारिकांना तसेच करारबद्ध परिचारिकांना स्थायी स्वरूपात शासकीय सेवेत सामावून घेणे, रुग्णालय परिसरात सुविधा उपलब्ध करून देणे, परिचारिका संवर्गासाठी स्वतंत्र संचालनालयाची निर्मिती करणे यासह विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी परिचारिकांनी सोमवार, 24 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय व अन्य आरोग्य संस्थांमधील परिचारिका 400 हून अधिक परिचारिका संपात सहभागी झाल्याने रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झालेली दिसून आली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने हा संप पुकारला असून, यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालयासह सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत कार्यरत परिचारिका सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, जिल्हय़ातील आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय सेवा पूर्णपणे प्रभावित झाली होती. दरम्यान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी परिचारिकांनी कुवतीप्रमाणे सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे रुग्णांना अतोनात त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने संप पुकारण्याची नोटीस 1 फेब्रुवारी रोजीच वैद्यकीय शिक्षण व संशोधन प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य सेवा प्रशासनाला दिली होती. मात्र, या नोटीसची कोणतीही दखल न घेतल्याने नर्सेस फेडरेशनवर हे आंदोलन करण्याची वेळ आली. शासनाने आम्हाला ड्युटी बजावण्यापासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप नर्सेस संघटनेने केला आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्षा अँड. अरुणा वाघमारे, सरचिटणीस अंजली मेटकर, कार्याध्यक्ष ताज अहमद खान, साबीर देशमुख, उमेश बघेल, सुनीता तेंडुलकर, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या नलिनी देशमुख, स्वाती गावंडे, सुनीता सावळे, प्रियंका आढे, रूपाली भोरे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील 400 हून अधिक परिचारिकांनी सहभाग नोंदवला. परिचारिकांनी सकाळी 8 वाजतापासून बंद पुकारल्याने सर्वच रुग्णालयांतील रुग्णांची देखभाल करण्यात आरोग्य यंत्रणा कमजोर ठरल्याचे चित्र दिसून येत होते.


कंत्राटींना लावले कामाला : कायमस्वरूपी परिचारिकांनी संघटनेच्या आदेशावरून कामबंद आंदोलन पुकारल्याने एकही कायमस्वरूपी परिचारिका आज कामावर हजर झाली नाही. त्यामुळे तोकड्या प्रमाणात उपलब्ध राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी परिचारिकांकडून काम करून घेण्यात आले. या वेळी त्यांनी आपल्या परीने रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशा मनुष्यबळाअभावी वैद्यकीय सेवा पुरवण्यात त्या अयशस्वी झाल्याचे दिसून आले.


सर्वोपचार पूर्ण बंद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत परिचारिकाच महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या पदाधिकारी असल्याने सर्वोपचार रुग्णालयात कामबंद आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले. या आंदोलनात 200 हून अधिक परिचारिका सहभागी झाल्या होत्या. यामुळे सर्वोपचारमधील कोणत्याच वॉर्डात एकही परिचारिका सोमवारी सकाळी 8 ते रात्री उशिरापर्र्यंत आढळून आली नाही, हे विशेष. या आंदोलनाला जिल्हा स्त्री रुग्णालयात परिचारिकांनी पाठिंबा दर्शवत सहभाग दिल्याने या रुग्णालयातील गर्भवती रुग्णांनाही फटका बसला.

‘ग्रामीण’मध्येही बंद : आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी तालुक्यांत शासकीय रुग्णालयातील परिचारिका कामावर आल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

गर्भवती महिलांना त्रास : जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिकांनी सकाळपासूनच कामबंद आंदोलन पुकारले. जिल्हा स्त्री रुग्णालयात रोज 60 ते 70 प्रसूती होतात, तर सद्य:स्थितीत 350 हून अधिक गर्भवती महिलांवर उपचार सुरू आहेत. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी परिचारिकांवर असल्याने महिलांचे हाल झाले.


राज्यस्तरीय मागण्या
> परिचारिका संवर्गासाठी स्वतंत्र संचालनालयाची निर्मिती.
> अस्थायी आणि बंधपत्रित परिचारिकांना तसेच करार बद्ध परिचारिकांना स्थायी स्वरूपात शासकीय सेवेत सामावून घेणे.
> जनरल नर्सिंग वैद्यकीय शिक्षण विभागाने पुन्हा सुरू करावे.
> प्री. रिन्हाइन ग्रेड पे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मिळावे.
> रिक्त पदे भरणे, रुग्णांसाठी साहित्याची पूर्तता करणे
> परिचारिकांना व्यवसायरोध भत्ता मिळावा