आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Illegal Gutkha Selling, Divya Marathi

गुटखा व्यावसायिकाला कोठडी; शहरात अजूनही कोट्यवधींचा साठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्‍यांनी दोन दिवसांत पाच ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये 11 लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात पोलिसात गुन्हे दाखल झाले असून, त्यातील एकाला न्यायालयीन तर चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान एका आरोपीला मंगळवारी जामीन देण्यात आला.


रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेल्या चंद्रनारायण लालचंद अग्रवाल यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना आधी न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीन दिला. नितीन लालचंद अग्रवाल, संजय गुरबानी, दिनेश पाहुजा आणि घनश्याम अग्रवाल यांच्याविरोधात शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यांनासुद्धा आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची एक दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दोन्ही प्रकरणांत आरोपीतर्फे अँड. दिलदार खान यांनी काम पाहिले. शहरातून दररोज लाखो रुपयांचा अवैध गुटखा शहरातच नव्हे, तर शहराबाहेर पाठवण्यात येतो. या संदर्भात काही व्यक्तींनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयात अकोल्यात गुटख्याची विक्री होत असल्याची तक्रार केली होती. त्याआधारे मुख्य कार्यालयातील अधिकार्‍यांनी शहरात 7 आणि 8 मार्चला दोन दिवस छापे टाकले. यादरम्यान 10 लाख 96 हजार 696 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी रजपूतपुर्‍यातील रहिवासी घनश्याम अग्रवालला अटक केली होती. ही कारवाई करताना मुख्य कार्यालयातील अधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍यांना काहीही न कळवता छापे टाकले. त्यामुळे स्थानिक अधिकार्‍यांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यांमध्ये लहान गुटखा व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, शहरात असे एकूण 8 मोठे व्यापारी आहेत. त्यांच्यावर अद्यापही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाही. काहींनी एमआयडीसी परिसरामध्ये गोदामात कोट्यवधींचा गुटखा साठवल्याची माहिती आहे. छोट्या व्यापार्‍यांवरील कारवाईमुळे शहरातील गुटखा किंग समजल्या जाणार्‍या नीलेश नामक व्यापार्‍याने 100 पॅकेटची किंमत 10 हजारांहून 12 हजार 500 रुपये केल्याची माहिती आहे, तर खुल्या बाजारात छोट्या दुकानदांराना एक पॅकेट 150 रुपयांपासून 170 रुपयांपर्यंत विकले जात आहे. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेत गुटख्याचा अवैध साठा करणार्‍यांनी जुन्या ठिकाणांहून गुटखा हलवला असून, तो नवीन ठिकाणी ठेवल्याची माहिती आहे.