आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Lado Killed Very Cruel Manner

तेल्हार्‍यात अपहृत लाडोचा निर्घृण खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडो - Divya Marathi
लाडो

तेल्हारा - येथील व्यापारी सागरकुमार बागाणी यांच्या विशाखा उर्फ लाडो या दीड वर्षीय चिमुकलीचे त्यांच्याच नोकराने आपल्या मित्राच्या मदतीने गुरुवारी अपहरण केले होते. शुक्रवारी त्या चिमुकलीचा मृतदेह येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयामागील एका शेतात आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत तिचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे.


सागरकुमार बागाणी यांच्याकडे घरकाम करण्यासाठी अक्षय पचांगे (19) नामक नोकर आहे. त्याने गुरुवारी सागरकुमार बागाणी यांच्या दीड वर्षीय लाडोचे सांभाळ करण्याच्या बहाण्याने अपहरण केले. या वेळी त्याला त्याचा मित्र अक्षय पुरोहित (20) याने मदत केली. अक्षय पचांगेने शेगाव रस्त्यावरील श्री दत्तवाडी येथे या चिमुकलीला सायकलने नेले. तेथे अक्षय पुरोहितने ठरलेल्या बनावानुसार अक्षय पचांगेच्या गळय़ाला चाकू लावून मुलीला पळवून नेले. लाडोचे अपहरण झाल्याची माहिती त्याने लाडोच्या वडिलांना दिली.


त्यांनी नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यादरम्यान अक्षय पुरोहितने जंगलात पोबारा केला. अक्षय पंचागेवर पोलिसांना संशय आल्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खंडणीच्या उद्देशाने अक्षय पुरोहितने लाडोचे अपहरण केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी अक्षय पुरोहितचा शोध घेतला असता एका गुराख्याला तो जंगलात दबा धरून बसल्याचे दिसले. त्याने लोकांना माहिती देताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेवटी त्याने लाडोचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनास्थळावर नेले असता डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात शुक्रवारी लाडोचा मृतदेह माती अंगावर टाकलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहापासून काही अंतरावर कपडे व चप्पल आढळली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी लाडोला चारचाकी गाडीत नेल्याची माहिती दिल्यानंतर नागरिकांनी शुक्रवारी शहरात वाहनांची तपासणी केली. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मी नांदेडकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनेचा तपास लावला. दरम्यान, लाडोच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ 1 मार्चला शहर बंद ठेवण्यात येणार आहे.