आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Lord Rama Rally, Divya Marathi

‘राजेश्वरनगरीत रामजी की निकली सवारी..’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘रामजी की निकली सवारी, रामजी की लिला है न्यारी’ या गीतावर जल्लोष करत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जंगी मिरवणूक निघाली. हजारोंच्या संख्येने सहभागी होत अकोलेकरांनीही जय श्रीरामचा जय जयकार केला. मिरवणुकीतील आकर्षक वेशभूषा केलेले बालक, बालिका, घोडेस्वार, अनेकविध धार्मिक, सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले.


शहराचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिरपासून या मिरवणुकीला सायंकाळी 5 ला प्रारंभ झाला. पितळीची राम दरबाराची मूर्ती वाजत-गाजत मोठय़ा राम मंदिरातून राजराजेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला. राजेश्वर मंदिरात आमदार गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया, डॉ. रणजित पाटील, अनुप धोत्रे, समीक्षा धोत्रे, बनवारीलाल पुरोहित आदींसह पदाधिकार्‍यांनी रामाच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी मंदिरावरून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आमदार हरिदास भदे, महापौर ज्योत्स्ना गवई, डॉ. अशोक ओळंबे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, हरिभाऊ भालतिलक, गोपाल खंडेलवाल, गिरिराज तिवारी, विनोद मनवाणी, हरीश आलिमचंदानी, ब्रिजमोहन चितलांगे, समितीचे अध्यक्ष बनवारीलाल बजाज, विजय अग्रवाल, प्रतुल हातवळणे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, अशोक गुप्ता, गिरिराज तिवारी, अनिल थानवी, गिरीश जोशी, अनिल मानधने, बाळकृष्ण बिडवई, वसंत बाछुका, अजय शर्मा, संदीप वाणी, अभय जैन, नवीन गुप्ता, रेखा नालट, वर्षा धनोकार, मनीषा अंबारखाने, अंजली कुळकर्णी, सोनल ठक्कर, अंजली जोशी, सुजाता बोडखे, किरण बजाज आदींसह मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक व त्यामागे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चांदीच्या पादुका व श्रीराम दरबाराचा रथ होता. त्यानंतर विविध सामाजिक संस्था, संघटनांनी साकारलेले देखावे मिरवणुकीत सहभागी झाले. जयहिंद चौकात मिरवणुकीचे फटाक्याची आतषबाजी व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. जयहिंद चौक, शहर कोतवाली चौक, मोठे राम मंदिर, टिळक रोड, जुना कापड बाजार, सराफा बाजार, गांधी चौकमार्गे शहर कोतवाली चौकात पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी श्रीरामांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती तसेच पिण्याचे पाणी, चहा, सरबत, मठ्ठा, प्रसाद वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटलेली होती. मिरवणूक मार्गाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. जयहिंद चौक ते गांधी रोडपर्यंत दुतर्फा भगवे ध्वज लावण्यात आले होते. शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या चौकात 70 फूट अहिरावणाचा वध करताना हनुमानजी, जुना कापड बाजारात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना छत्रपती शिवराय, गांधी चौकात छाती फाडून श्रीरामांचे दर्शन घडवणारे हनुमानजी तसेच कमळ पुष्पातून प्रगटणारा राम दरबार आदी देखावे लक्ष वेधत होते तसेच ठिकठिकाणी कारंजे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.


तसेच माळीपुरा युवा ग्रुपने सांस्कृतिक देखावा, रामराज्य युवा ग्रुपतर्फे राम, लक्ष्मण, सीता, खोलेश्वर क्रांती तरुण मंडळातर्फे राम दरबार, विश्व हिंदू परिषदेतर्फे राम दरबार, खंडेलवाल वैश्य समाजाने संत सूरदासजी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वामी विवेकानंद आणि त्यांचा संदेश, गायत्री माता मंडळाने बालशिवाजी, राधेनगर मित्र मंडळाने श्री शंकरजी आणि उत्तर भारतीय युवा मंचने देखावा सादर केला.


महिला भजनी मंडळाचा सहभाग : मिरवणुकीत यंदा महिला भजनी मंडळेही मोठय़ा संख्येने सहभागी झाली. टाळ मृदंगाच्या तालावर पावली खेळत त्यांनी भजने सादर केली. यामध्ये राजेश्वर हरिपाठ मंडळ, नवनाथ मंडळ, आई रेणुका महिला मंडळ, संत गजानन महाराज मंदिर जुने शहर महिला मंडळ, विश्वरूपिनी महिला भजन मंडळ, रुख्मिणी महिला भजनी मंडळ आदींचाही सहभाग होता.


चिमुकल्यांनी वेधले लक्ष : मिरवणुकीच्या अग्रभागी घोड्यांवर विविध महापुरुषांच्या वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यामध्ये अथर्व वानखडे, राम कंझरकर शिवाजी महाराज, अभिषेक भिरड महाराणा प्रताप, अमृता राऊत झाशीची राणी, पूजा नालट जिजाबाई, प्रसाद नालट भगतसिंग, आदित्य काठोके शहाजी राजे, श्रीपाद डेहनकारने बाजीराव पेशवे, अथर्व मांडेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. मात्र पालखीतून निघालेला धनुर्धारी बाल राम साकारणारा मंदार मांडेकर मिरवणुकीमध्ये अधिक लक्ष वेधत होता.