आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: बालपणीच मराठीचे संस्कार व्हावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भाषा ही समूहाची ओळख असते. भाषेवरून व्यक्तीची ओळख पटते. त्यामुळे भाषेला महत्त्व आहे. त्यामुळे लहानपणापासूनच घरी तसेच शाळेत मराठी भाषेचे संस्कार झाले पाहिजे, असे मत शहरातील मान्यवरांनी मराठी राजभाषा दिवसानिमित्त व्यक्त केले. 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरी केली जाते.


मराठीचा अटकेपार झेंडा
जागतिकीकरणात मराठी भाषा टिकेल का, असा प्रश्न होता. पण आज ती स्थिती नाही. मराठी भाषा संगणकावर विराजमान झाली आहे. कितीतरी लेखकांचे ऑनलाइन साहित्य सहज वाचता येतात. मराठी विश्वकोशाचे सर्व खंड ऑनलाइन उपलब्ध आहेत. आता मोबाइलमध्ये ज्ञानेश्वरीचे अँपदेखील डाउनलोड केले जात आहे. यावरून मराठीचा झेंडा अटकेपार गेल्याचे स्पष्ट होते. कीर्तन, लोकगीत, भजने, लोकसंस्कृती यातून भाषा जिवंत आहे. ’’डॉ. श्रीकृष्ण राऊत, गझलकार


पुढच्या पिढीपर्यंत भाषा पोहोचावी
मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी घरापासून सुरुवात झाली पाहिजे. सध्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्याचे प्रमाण जास्त आहे. विद्यार्थी शाळेत इंग्लिश शिकल्यावर मराठीकडे वळतात. त्यापेक्षा बालपणापासून मराठीची गोडी निर्माण केली पाहिजे. बालवयातच स्तोत्र, मराठी संगीत कानावर पडल्यास फायदाच होतो. विदेशातील मुलंदेखील मराठी शिकत आहेत. साहित्य, संगीताच्या माध्यमातून भाषेविषयी आवड निर्माण करता येते.’’ डॉ. नानासाहेब चौधरी, ज्येष्ठ अभ्यासक


आवर्जून मराठीत बोलावे
प्रत्येकाने आवर्जून मराठीतच बोलावे. मुलं प्राथमिक शाळेत असतानाच मराठी भाषेवर अधिक भर द्यावा. एमएच्या विद्यार्थ्यांना मराठी वर्णमाला पूर्ण, बिनचूक येत नाही, हे आपले दुर्दैव आहे. विदेशी भाषा शिकण्याकडे कल वाढत आहे. पण, मातृभाषेचे काय, याचा विचार गांभीर्याने झाला पाहिजे. भाषा समजून घ्यावी. उच्चारांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. बोलताना, लिहिताना आपण किती चुकतो, याकडे कधी लक्षच दिले पाहिजे. ’’ डॉ. विमल भालेराव, माजी प्राचार्य


घरापासूनच घ्यावी काळजी
मराठी भाषेविषयी मोठय़ा प्रमाणात जागृती होत आहे. आता स्पर्धा परीक्षेत मराठी विषय घेऊन मुलं आयएस, आयपीएस अधिकारी होत आहेत. मराठीचा स्वाभिमान बाळगण्यासाठी घरापासूनच काळजी घेतली पाहिजे. घरी, दुकानदारांशी मराठीतच बोलावे. मराठी चित्रपट, मालिका यांची वाढती लोकप्रियता पाहता भाषेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. हिंदी वाहिन्यांप्रमाणेच मराठी वाहिन्या, वृत्तवाहिन्यांची संख्या वाढत आहे. भाषेच्या अभिमानात राजकारण नाही, तर तो स्वाभिमान आहे.’’डॉ. नारायण कुळकर्णी कवठेकर, ज्येष्ठ कवी