आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावीचा राणा अकोल्यात दाखल; दर्शनासाठी मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतसे’ या अभंगाची अनुभूती घेत शेगाववरून 5 जूनला निघालेले वारकरी शनिवार, 7 जूनला पहाटे 6.30 ला डाबकी मार्गावरील रेल्वे गेटमार्गे अकोलानगरीत दाखल झाले. भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करून पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.

संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनापूर्वी डाबकीरोडवरील भाविकांनी स्वागताची जंगी तयारी केली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर महिलांनी रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. वारकर्‍यांसाठी चहा, फराळ, बिस्किटे, दुपट्टे, सरबत वितरणाची व्यवस्था होती. सकाळी 6.30 ला रेल्वे गेट ओलांडून पालखी शहरात दाखल झाली. रेल्वे गेटवरच भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. तेथून हा लवाजमा हळूहळू पुढे सरकला. वाटेत पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला-पुरुषांनी एकच गर्दी केली होती. पहाटे 6 पासून स्नान करून हातात पूजेचे ताट घेऊन महिला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पालखीची प्रतीक्षा करीत होत्या. बच्चे कंपनीही पालखीच्या दर्शनासाठी उभी होती.

अग्रभागी अश्व, त्यानंतर ध्वजधारी, टाळ-मृदंगाचा गजर करीत संत भजनावर पावल्या खेळत सहभागी झालेले वारकरी व त्यामागे वाहनांचा ताफा होता.

किती सेवा करू तुझी भगवंता..
पालखी म्हणजे फक्त धार्मिक, आध्यात्मिक संदेश देणारी नसून, या माध्यमातून सामाजिक एकतादेखील जपली जाते. पालखीचे सकाळी शहरात आगमन झाल्यानंतर जागोजागी स्वागत केले. ठिकठिकाणी पाणी पाउच, बिस्किट, शरबत, प्रसादाचे वाटप करण्यात आले. डाबकीरोडवर सुनंदा रोकडे, मीना मांडेकर, शीतल धोटे, शीतल राजपूर, स्मिता शर्मा या महिलांनी 600 बिस्किट पॅकेट, गोडबोले प्लॉट येथील नम्रता अपार्टमेंटमधील रहिवासी विजय मुंदडा, प्रसन्न देशपांडे, अंकुश जोशी, सुरेश देशपांडे, अमोल कुळकर्णी, शंकर कोगदे यांनी 550 दुपट्टय़ांचे वाटप केले.