आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Shegov, Gajanan Maharaj, Divya Marathi

श्रींच्या पालखीचे हर्षोल्लासात स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेगावीच्या राणाचे आपल्या लवाजम्यासह 7 जूनला शहरात दाखल झालेल्या पालखीचे दुसर्‍या दिवशी 8 जूनलाही तेवढय़ाच भक्तिभावाने व हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. जुने शहरातील स्वागतानंतर पालखीने आज नवीन शहरातील स्वागत सत्कार स्वीकारुन रात्रीचे मुक्काम स्थळ गाठले.

पालखीने रविवार, 8 जूनला सकाळी सहाला मुक्कामाचे स्थळ असलेल्या मुंगीलाल बाजोरिया येथून प्रस्थान केले. तेथून पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात टॉवर चौक, एल.आय.सी. ऑफिस रोड, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन, आकाशवाणी मार्गे नेहरू पार्क, गोरक्षण मार्ग, जुने इन्कमटॅक्स चौक, हिंदू ज्ञानपीठ, आदर्श कॉलनी, संभाजीनगर, डॉ. शेवाळे यांच्या बंगल्यासमोरून श्री गजानन महाराज मंदिर, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, जिल्हा सवरेपचार रुग्णालय, जिल्हा परिषद, सरकारी बगीचा, खोलेश्वर, शहर कोतवाली, लोखंडी पुलावरून जयहिंद चौक, राजराजेश्वर मंदिर मार्गे हरिहरपेठेतील शिवाजी टाउन शाळेत दुसर्‍या दिवशीच्या मुक्कामाकरिता पोहोचली. पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी पालखीच्या पूजन व स्वागतासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. टॉवर चौकात भाविकांनी मोठय़ा उत्साहाने पालखीचे स्वागत केले. दर्शनासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर महिलांनी रांगोळीने पालखीचा मार्ग सजवला होता. ‘गण गण गणात बोते’चा गजर करीत पालखी दुपारच्या मुक्काम स्थळी पोहोचली. आदर्श कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक 16 येथे वारकर्‍यांनी दुपारचे भोजन घेतले. या ठिकाणी आदर्श सेवा समितीतर्फे भाजी, पोळी, बुंदीचा लाडू असा महाप्रसाद वारकर्‍यांसह भाविकांना वितरित करण्यात आला. येथे थोड्या वेळ विर्शांतीनंतर पालखी सिंधी कॅम्प परिसराकडे रवाना झाली. पताकाधारी, 650 वारकरी, तीन अश्व, दोन रुग्णवाहिका, चार ट्रक, एक लक्झरी बस, पाण्याचा टँकर असा लवाजमा सिंधी कॅम्प परिसरात पोहोचताच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली.

17 वर्षांपासून हत्ती, अश्वाची सेवा
आदर्श कॉलनीतील शेषराव सुकडीवर कुटुंबीय 17 वर्षांपासून पालखीतील हत्ती व अश्वाची सेवा करतात. पालखी शाळा क्रमांक 16 मध्ये पोहोचली की हत्ती अन् अश्व सुकडीकरांच्या घराचा रस्ता गाठतात. माणसे नवीन असली तरी ते रस्ता विसरत नाही. सुकडीकर म्हणतात, आमच्याकडे दरवर्षी पालखी आली की आम्ही हत्ती, अश्वाच्या चारा-पाण्याची व्यवस्था करतो. वारकर्‍यांची सेवा अनेक जण करतात मात्र मुक्या प्राण्यांचे काय? म्हणून आम्ही ही सेवा देतो. आधी थंड पाण्याने त्यांची आंघोळ घालून शेतातील हिरवा चारा, भिजवलेले चणे देतो.
राम कृष्ण हरी..
चंपाकली हत्तीणीच्या मृत्यूनंतर आता तीन अश्वच पालखीची शान आहेत. या अश्वांची नावे राम, कृष्ण व हरी अशी आहेत. म्हणजे त्यांची नावे उच्चारताना आपसूकच परमेश्वराची सेवा घडते. हे अश्व गत 20 वर्षांपासून श्रींच्या सेवेत असून, यापैकी हरी हा मानाचा अश्व आहे. पंढरपुरातील वाखरी या गावी तो रिंगणात सहभागी होतो. एवढेच नव्हे तर टाळ मृदंगाच्या तालावर तो पावलीही खेळतो. तीन सेवेकरी व तीन वारकरी या अश्वांच्या सेवेत असतात. वाटेत भाविकांकडूनच त्यांच्या चार्‍यांची व्यवस्था केली जाते.

महाराज उद्या होणार रवाना
दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर सोमवारी 9 जूनला सकाळी सहाला हरिहरपेठेतील टाउन शाळेतून पालखी आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी टाउन शाळेत रात्री कीर्तन, प्रवचन, भजने, श्रींच्या जीवनावरील चित्रपट दाखवण्यात आला.