आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Traffic Police, Divya Marathi

थांब! नगदी देतोस की मांडून ठेवू?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात आणि जिल्ह्यात नियमबाह्य प्रवासी वाहतूक वाढली आहे. परिणामी, वाहनांची कोंडी होत आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून चिरीमिरी घेऊन नियम मोडणार्‍यांना सोडून दिले असल्याचे ‘दिव्य मराठी’ने गुरुवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 या वेळेत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे या पोलिसांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


शहरात छोटे-मोठे 100 चौक आहेत. शिवाय शहरातून मध्य प्रदेश, नागपूर, औरंगाबाद, हैदराबादकडे मार्ग जातात. त्यामुळे जड वाहनांची कायम वर्दळ असते. नियमित येणार्‍या आणि नियम न पाळणार्‍या जड वाहनधारकांसोबत शहरातील वाहतूक पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने विचार‘विनिमय’करून त्यांना सोडून दिले जात असल्याचे दिसले. त्यासाठी वाहनधारकांकडून 100 ते 500 रुपये घेतले जात होते. मात्र, याची कोणतीही पावती या वाहनधारकांना दिली जात नव्हती. दरम्यान, नेहमीच या रस्त्यावर येणारे काही वाहनधारक इशारा करून आपले पैसे डायरीत मांडून ठेवा. नंतर देतो, असे सांगत होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या वाहतूक पोलिसांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.


मुद्देमाल दादाच्या हातात
ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचा पाठलाग : नियम मोडणार्‍या वाहनधारकांनी पैसे दिले नाही त्यांच्या गाडीचा क्रमांक पुढच्या चौकातील वाहतूक शिपायाला भ्रमणध्वनीवरून कळवला जात होता किंवा पाठलाग केला जात होता.


स्टेशन डायरीत नोंद नाही
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने सायंकाळी 7 वाजता सिव्हिल लाइन परिसरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयाला भेट दिली. या कार्यालयात ज्या वाहनांवर कारवाई करून दंड आकारला जातो त्यांची नोंद स्टेशन डायरीत घेतली जाते. पण, गुरुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळात स्टेशन डायरीमध्ये पाच दुचाकी, सहा चारचाकी आणि दोन तीनचाकी वाहनांवर कारवाई केल्याची नोंद होती. यात एकाही जड वाहनाची नोंद नव्हती. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता, काही शिपाई अजून यायचे आहेत ते आल्यानंतर त्यांनी केलेल्या कारवाईची नोंद केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


नियम मोडणार्‍यांकडून दंड आकारला जातो
नियम मोडणार्‍यांनी दंड भरावा, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे ज्या कुणी वाहनधारकांनी नियम मोडला त्यांच्याकडून आमचे वाहतूक पोलिस तत्काळ दंडाची रक्कम वसूल करतात. त्यासाठी रस्त्यावरच पैसे घ्यावे लागतात. त्याची वाहनधारकांना रीतसर पावतीही दिली जाते. पण, काहींना वाटते पोलिस पैसे घेत आहेत. त्यांनी कारवाईची ही प्रक्रिया समजून घ्यावी. एस. एस. ठाकूर, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, अकोला.