आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Traffic Police, Security, Crime

दोन लाख वाहने अन् 40 पोलिस, अकोला वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होत असून, पादचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मात्र, वाहतुकीच्या नियंत्रणाची जबाबदारी केवळ 40 पोलिसांच्या खांद्यांवर आहे.


शहराची लोकसंख्या सहा लाखांपेक्षा जास्त आहे. त्यात शहरालगतच्या गावांची लोकसंख्या धरल्यास ती 10 लाखांच्या जवळपास जाते. शहरात दररोज येणार्‍या वाहनांची संख्या एक लाख 40 हजार असून, त्यात ग्रामीणमधून येणार्‍या वाहनांची संख्या 60 हजारांच्या आसपास आहे. या सर्व वाहनांना केवळ 40 पोलिस विविध चौकाचौकांतून नियंत्रित करत आहेत. शहरामध्ये लहानमोठे रहदारीचे 100 चौक आहेत. या संपूर्ण चौकामध्ये पोलिस तैनात ठेवणे शक्य नसल्यामुळे पेट्रोलिंगची तीन-तीन कर्मचार्‍यांची दोन पथके दिवसभर कार्यरत असतात. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत आहे. सन 2011 ते सन 2013 या दोन वर्षांच्या काळात मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलिसांनी काही वर्षांच्या तुलनेत सरासरी वार्षिक 65 लाख रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल केला आहे. शहरातील सिग्नल व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. त्यातच रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनावर कारवाईसाठी महापालिकेकडे टोईंग मशीन नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात : चौकातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना हातवारे करूनच वाहतूक थोपवावी लागत आहे. सतत 12 तास हातवारे करून वाहतूक थोपवणे शक्य नसते. त्यामुळे अनेक वेळा पोलिस चौकात मध्ये उभे राहतात. त्यांच्यापर्यंत वाहने उभी राहतात, अशावेळी त्यांना वाहनांचा धक्का लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे.


जड वाहतुकीची बंदी नावालाच : शहरातून जड वाहतुकीला विशिष्ट वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहराबाहेरून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी बायपास नसल्यामुळे शहरातील सर्वाधिक रहदारीच्या अशोक वाटिका चौक ते मुख्य बसस्थानक-रेल्वेस्थानक मार्गावरून अनेक जड वाहने सुरूच असतात. तसेच मालधक्काही या रस्त्यावर आहे आणि शासकीय बांधकांमाचे साहित्याची ने-आण करणार्‍या मोठय़ा वाहनांना तसेच रेल्वेतून येणार्‍या रासायनिक खतांची वाहतूक करणार्‍या वाहनांना सूट असल्यामुळे अशी असंख्य वाहने रस्त्यावरून धावतात. त्यामुळे जड वाहतूक बंदी केवळ नावालाच आहे.


एसटी बसमुळे वाहतूक प्रभावित : सर्वाधिक वाहतूक अशोक वाटिका चौक ते रेल्वेस्थानक चौक रस्त्यावर होते. याच रस्त्यावर मुख्य डाक घर, धिंग्रा चौक, मुख्य बसस्थानक, बाजी बाजार, सर्किट हाऊस, स्टेट बँक, जुने बसस्थानक, लेडी हार्डिंग चौक, शहरातील मुख्य स्टेडियम, न्यायालय, रेल्वेस्थानक आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. तसेच कधीकधी एकाचवेळी चार-चार बस बसस्थानकात आत-बाहेर करत असल्यामुळे वाहतूक प्रभावित होते.