आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला - सध्या सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीचा परिणाम बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर वाढणार्या कुलर, एसी (एअरकुल), बाटलीबंद पाणी, माठाच्या खरेदीला तूर्त ‘ब्रेक’ लागल्याने व्यावसायिक ‘थंड’ झाले आहेत.
गारपिटीने बाजाराचा प्रमुख घटक असलेल्या शेतकर्याचे कंबरडेच मोडल्याने त्याचा परिणाम व्यावसायिकांवरही झाला आहे. उन्हाळा सुरु होऊनही एसी, कूलर, मातीचे माठ व फ्रीज खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. उन्हापासून बचाव करणार्या टरबूजाची विक्रीसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. साधारणत: 14 फेब्रुवारीपासून ऊन तापण्यास प्रारंभ होतो. परंतु, यंदा वातावरणातील बदलामुळे मार्चच्या दुसर्या आठवड्यातही तापमानाचा पारा 20 ते 30 अंश सेल्सिअसच्या आत-बाहेरच आहे. गेल्यावर्षी अकोल्यात या कालावधीत पारा 35 अंश सेल्सिअसवर होता.
मागील वर्षीच्या फेब्रुवारी ते मार्चच्या पंधरवड्यापर्यंत झालेल्या विक्रीच्या तुलनेत यंदा निम्माही व्यवसाय झाला नाही, असे व्यावसायिकांनी म्हटले आहे. गत उन्हाळय़ातील तापमानाचा अंदाज घेऊन व्यावसायिकांना या वेळी अधिक पैसे गुंतवले आहे. परंतु, ही उपकरणे खरेदी करण्यास ग्राहकच नाही. मागील तीन वर्षांत प्रथमच अशी मंदी आली आहे. यंदा फे ब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत फक्त पाच एसीची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात 30 एसीची विक्री झाली होती, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली.
गरिबांचा फ्रीज असलेल्या माठ खरेदीसाठी ग्राहक फिरकत नाहीत. सध्या भट्टी लावणेही शक्य होत नसल्याचे विक्रेते सांगत आहेत.
पाणी कॅन कमी झाल्या
उन्हाळय़ाच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात मिनरल वॉटरची मागणी असते. परंतु सध्या ही मागणी घटून निम्म्यावर आली आहे. गेल्यावर्षी या काळात दिवसभरात 70 ते 75 कॅनची मागणी होती. ती सध्या 25 ते 30वर आली आहे. त्यासोबतच मंगल कार्यालयासह काही खाजगी कार्यालयातूनही होणारी पाण्याची मागणी घटली आहे. सुनील शर्मा, व्यावसायिक
पैसा आला तरच..
नोकरदार वर्गासोबतच शेतकरीसुद्धा एक चांगला ग्राहक आहे. केवळ एका वर्गावर व्यवसाय होणे शक्य नाही. त्यामुळे शेतकर्यांजवळ पैसे येणे गरजेचे आहे. मागील 15 दिवसांपासून ग्राहक दुकानात येऊन केवळ उपकरणांची चौकशीच करत आहेत. खरेदी मात्र करत नाहीत. नैसर्गिक प्रकोपामुळे ग्राहकांचा कल घटला आहे. ग्राहकांची प्रतीक्षा करणे एवढेच शिल्लक राहिले आहे. अनंत धुमाळ, व्यावसायिक
व्यवसायावर परिणाम
गेल्या वर्षी याच काळात दररोज पाच हजार रुपयांच्या माठाची विक्री होत होती, ती यंदा अवघी पाचशे रुपयांवर आली आहे. वातावरणात गारठा असल्याने दिवसभर ग्राहकांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. यावर्षी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. परंतु, हा पैसा निघतो की नाही, याचीही शंकाच आहे. आत्माराम कटारे, माठ विक्रेता, अकोला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.