आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi,Lok Sabha Election, Divya Marathi, Candidature

उमेदवारांकडून थेट गाठी-भेटींवर भर, उमेवारांची अखेरच्या तासातील धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लोकसभा मतदारसंघात गुरुवार, 10 एप्रिलला मतदान होत असून, मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर मतदानापूर्वीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तासांमध्ये उमेदवारांनी मतदार, कार्यकर्त्यांच्या थेट गाठीभेटी घेण्यावर भर दिला. ‘रात्र थोडी अन्..’ अशी परिस्थिती असल्याने शहरासह ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधताना उमेदवारांची धावपळ झाली.
संजय धोत्रे यांनी बुधवारी दिवसभर कार्यकर्ते अन् मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला. भल्या पहाटेपासून ते कामाला लागले. सकाळी शहरात वेळ दिल्यानंतर दुपारी त्यांनी रिसोड परिसरात भेटी दिल्या. शक्य त्यांच्या थेट गाठीभेटीनंतर अनेकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात ते बुधवारी दिवसभर व्यस्त होते. मतदानाच्या अंतिम टप्प्यातील सर्व नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी 7 पासून आपल्या गाठीभेटींना प्रारंभ केला. सकाळी त्यांनी ग्रामीण भागातील संपर्काला प्राथमिकता दिली, तर दुपारनंतर त्यांनी अकोला शहरात संपर्कावर भर दिला.
यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रमुख पदाधिकारी, मतदार, तसेच शहरातील मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते, त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. बुथ कमिटीच्या नियुक्तींचा आढावा घेत एकंदर व्यवस्थेची पाहणी केली. बी. सी. कांबळे यांनीदेखील पहाटेपासून अधिकाधिक जनसंपर्कावरच भर दिला. सकाळी मूर्तिजापूर, अकोट, बाळापूरमधील मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. बुथच्या याद्या पुरवणे, पोलिंग बुथचे एजंट नेमणे आदींचाही आढावा घेणे, भ्रमणध्वनीवरून जेवढय़ांशी संपर्क साधणे शक्य असेल त्यांच्याशी वार्तालाप करणे सुरूच होते. सायंकाळी अकोल्यात दाखल होईपर्यंत जेवणही न घेतल्याचे त्यांनी सांगितले. इतर उमेदवारांशी संपर्क होऊ शकला नाही. एकंदर सर्वच उमेदवारांनी अखेरच्या काही तासांमध्ये उर्वरित कामांचा आढावा घेत मतदार, कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यावर भर दिला.
कत्ल की रात’
मतदानाची आदली रात्र कत्ल की रात म्हणून ओळखली जाते. या रात्रीतून अनेकदा समीकरणे बदलली जात असतात. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या रात्रीचा बदलासाठी पूरेपूर वापर करून घेतला.