आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिखलीजवळ अपघातात तीन सरपंचांसह चार ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली - जळगाव खान्देश येथे सरपंच महापरिषदेसाठी जाणार्‍या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातील सरपंचांच्या वाहनास कोलारा फाट्यानजीक भीषण अपघात होऊन तीन सरपंचांसह एक सरपंच पती असे चार जण ठार झाले. हा अपघात शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चिखलीपासून पाच किलोमीटर अंतरावर मेहकर-चिखली मार्गावर झाला.


या अपघातामध्ये धामणगाव रेल्वे परिसरातील प्रवीण देवीदास गुल्हाणे (जुना धामणगाव), अरविंद शंकर टाले (गुंजी), नरेंद्र वसंतराव बहुरूपी (वाठोडा) आणि मंगेश वामन म्हात्रे (ढाकुलगाव) हे चौघे जागीच ठार झाले. यातील नरेंद्र बहुरूपी हे तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते.


स्कॉर्पिओचालक प्रवीण वसंतराव भलावी (35, झाडा), अतुल वसंत कुंभे (38, सरपंच, झाडा), अनिता अरविंद टाले (40, सरपंच, गुंजी), योगिता मुकुंदा कोकाटे (41, सरपंच, दाभाडा) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम चिखली ग्रामीण रुग्णालयातून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार करून नंतर त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे.


धामणगाव रेल्वे येथून रात्री साडेनऊच्या सुमारास स्कॉर्पिओ क्रमांक एमएच-31-सीएम-5592 द्वारे हे सर्व जळगाव खान्देश येथील जैन हिल्स येथे 15 व 16 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या सरपंच महापरिषदेसाठी निघाले होते. दरम्यान, मेहकर तालुक्यातील त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन मध्यरात्री ते जळगाव खान्देशसाठी रवाना झाले होते. मेहकर सोडल्यानंतर सुमारे 40 किलोमीटर अंतरावर चिखलीनजीक कोलारा फाट्यानजीक पहाटे एका वळणावर स्कॉर्पिओ रस्त्याच्या उजव्या बाजूकडील कडूलिंबाच्या झाडावर धडकली. अपघात एवढा भीषण होता की, स्कॉर्पिओमधील चार जण घटनास्थळीच ठार झाले. पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकास एका वाटसरूने अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जी. डी. भोई, पोलिस नायक संतोष शेळके, चालक राजपूत यांनी घटनास्थळ गाठून अपघातातील जखमी व मृतकांना वाहनातून बाहेर काढून चिखली ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेव्हा प्रवीण गुल्हाने, गुंजी येथील महिला सरपंचांचे पती अरविंद टाले, नरेंद्र वसंतराव बहुरूपी, मंगेश म्हात्रे हे घटनास्थळीच ठार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक जी. डी. भोई यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, वृत्त लिहीपर्यंत ते दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. धामणगावजवळच्या सरपंचांच्या वाहनाला अपघात झाल्याचे समजताच भाजप नेते माजी आमदार अरुण अडसड हे मृतक व जखमींच्या नातेवाइकांना सोबत घेऊन तातडीने चिखली शहर गाठले होते. चारही मृत व्यक्तींचे पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांनी स्वत: हे पार्थिव धामणगाव रेल्वेकडे रवाना केले. या वेळी त्यांच्या समवेत चिखली येथील कार्यकर्ते होते.