आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात भाजप व भारिप-बमसंच्या प्रचार मोहिमेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोल्यात भारिप-बहुजन महासंघ काँग्रेसच्या हातात हात घालून लढणार की, स्वबळावर पतंग उडवणार, या चर्चेत सर्वांना गुंतवून भारिप-बमसं आणि भाजपने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिका बाकी असल्याने भाजप कार्यकर्ते विविध फ्रंटवर कामाला लागले आहेत. काँग्रेसला आघाडी की बिघाडी, यात अडकवून भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी तालुका मेळावे व जनसंपर्क सुरू केला आहे. काँग्रेसमधील नेते मात्र उजाड गावची पाटीलकी राखण्यासाठी धडपडत आहेत.


संजय धोत्रेंचे एकेकाळचे पक्षांतर्गत स्पर्धक नारायणराव गव्हाणकर आता काँग्रेसवासी झाले आहेत. पक्षांतर्गत विरोधकांमध्ये इतर आव्हान देण्याइतकी क्षमता नाही. मित्रपक्ष शिवसेनेकडूनही डोकेदुखीची शक्यता नाही. ताज्या जि. प. निवडणुकीत आणि कालच्या टोलविरोधी आंदोलनात खरी शक्ती स्पष्ट झाल्याने मनसेकडूनही धोका संभवत नाही. त्यामुळे धोत्रे पूर्णवेळ प्रचार, आखणी व जनसंपर्कावर देत आहेत. जि.प. निवडणुकीत पक्षाची सरस कामगिरी आणि काँग्रेसच्या अपयशामुळे भारिप-बमसं नेत्यांचे मनोबल उंचावले आहे. आघाडीच्या मुद्दय़ावरून दिसत असलेला काँग्रेसमधील विरोधाभास आपल्या पथ्यावरच पडण्याची आशा बमसंला वाटते. प्रदेशपातळीवरील नेते भारिप-बमसंशी आघाडी करण्यास उतावीळ, तर स्थानिक नेत्यांना त्यांचे गाव उजाड करणार्‍या भारिप-बमसंशी कोणत्याही प्रकारची मैत्री नको, असा विरोधाभास काँग्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. अँड. आंबेडकर अकोल्यातून लोकसभेत गेल्यास कॉग्रेसचे पूर्णत: अस्तित्वहीन होण्याची भीती खरी ठरण्याची शक्यता स्थानिक नेत्यांना वाटते. त्यामुळेच काहीही नसण्यापेक्षा उजाड गावची पाटीलकी काय वाईट, अशी त्यांची भूमिका आहे. माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकरांसाठी अकोला सोडल्याचे वक्तव्य अकोल्यात केल्याने स्थानिक नेते निराश झाले. मात्र, निवडणूक लढवण्याची हौस भागवण्यास ते तयार दिसतात. भारिप-बमसंची चमू जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काँग्रेसला आघाडी करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे बमसंला वाटते. कारण महायुतीने राज्यसभेत धाडून रामदास आठवले यांची सोय लावली आहे. अमरावतीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या बिकट परिस्थितीला रा.सू. गवई गट तोंड देत आहे. तिकडे नागपुरात प्रा. जोगेंद्र कवाडे यांना काँग्रेसशी बोलणीची चातकासारखी प्रतीक्षा आहे. अशाप्रकारे तीन दिग्गज दलित नेत्यांच्या तलवारी जवळपास म्यान झाल्याने आघाडीसाठी काँग्रेसपुढे एकमेव भारिप-बमसंचा पर्याय आहे. त्यामुळे आघाडीबाबत बमसं निश्चिंत आहे.


आपची भीती सरली
दिल्लीत गाजावाज करून सत्तेत आलेले ‘आप’वाले अकोल्यातील भाजपचे गणित बिघडवतात की काय, अशी स्थिती सुरुवातीला निर्माण झाली होती. पण, नवी दिल्लीतच रोज नवनवीन समस्यांना तोंड देता देता ‘आप’ची पुरेवाट होत आहे. त्यात आता ‘आप’ने केवळ दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ टार्गेट केल्याने धोत्रेंवरील ‘आप’चा ताप कमी झाला आहे.