आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू, सुसाट वार्‍याने घेतला बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सुसाट वार्‍यामुळे जुने शहरातील भीमनगरमध्ये असलेल्या एका आखाड्याची भिंत कोसळल्याने तिच्या आडोशाला बसलेल्या दोन मजुरांचा करुण अंत झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.
भीमनगरमध्ये नूतन बौद्ध आखाडा आहे. या आखाड्याच्या भिंतीशेजारी दोन मजूर दुपारी नेहमीप्रमाणे विसावा घेत होते. हे दोघेजण सावलीमध्ये बसून गप्पा मारत होते. गुरुवारी दिवसभर जोराचा वारा वाहत असल्याने एक बाभळीचे झाड सुसाट वार्‍यामुळे भिंतीला धडकत होते. अगोदरच कमकुवत झालेली भिंत झाड धडकत असल्याने कोसळली. त्यामुळे आडोशाला बसलेले मुकुंदा इरबान सिरसाट (50) रा. भीमनगर व त्यांचा सोबती भिंतीखाली दबले. भिंतीखाली दबलेल्या दुसर्‍या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. कोसळलेल्या भिंतीखाली दोघेजण दबल्याची बाब काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी धावाधाव करून भिंतीखाली दबलेल्या मुकुंदा सिरसाट आणि दुसर्‍या व्यक्तीस बाहेर काढून सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मुकुंदा सिरसाट व दुसर्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला.


शिकस्त इमारतींचे बळी
शहरातील शिकस्त इमारतींची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शिकस्त व धोकादायक इमारती व भिंतींकडे मनपाने दुर्लक्ष केले. परिणामी, शिकस्त इमारती किंवा भिंती कोसळून बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तोच प्रकार गुरुवारी घडल्याने मनपाची निष्क्रियता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

वार्‍याचा गोंधळ
शहरात गुरुवारी दुपारी सुटलेल्या सुसाट वार्‍यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता. वार्‍याचा वेग जास्त असल्याने भीमनगरातील भिंत कोसळून दोन निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. वार्‍यामुळे पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागला.