आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola News On Toll Politics, Prithiviraj Chavan, MNS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे, सीएमच्या ‘टोल’ यादीची ‘पोल’खोल, नसलेला नाका करणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या बैठकीत तयार झालेल्या बंद करावयाच्या टोल नाक्यांच्या यादीत घोळ असल्याचे उघडकीस आले आहे. बैठकीत बंद करण्यावर एकमत झालेल्या टोल नाक्यांच्या यादीत बाळापूर-शेगाव मार्गावरील नाक्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात हा टोल नाका डिसेंबर 2012 मध्ये बंद झाला असून, आज तेथे नाक्याच्या खाणाखुणादेखील राहिलेल्या नाहीत.


10 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च झालेल्या मार्गांवरील 28 टोल नाके बंद करण्यासोबतच सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे टोलधोरण आणले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिले होते. टोल धोरणातील त्रुटींवर सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या वेळी टोल विषयावरील तज्ज्ञ आणि काही संपादकही बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर राज्यातील सध्या कार्यरत 28 टोल नाके बंद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना लेखी पत्र आणि बंद करणार असलेल्या टोल नाक्यांची यादी दिली. या यादीत पश्चिम विदर्भातील बाळापूर-शेगाव मार्गावरील टोल नाक्याचा समावेश आहे. संत श्री गजानन महाराजांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव मार्गावरील टोल नाका 16 डिसेंबर 2012 रोजी बंद करण्यात आला आहे. टोल बुथसह इतर सर्व साहित्यही त्याच वेळी काढण्यात आले. आता तिथे केवळ गतिरोधक शिल्लक आहे. बाळापूरकडून शेगावकडे जाणार्‍या मार्गावर टोल नाका उभारण्यासाठी 2003 मध्ये शासन स्तरावर मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात जून 2004 मध्ये टोल नाका उभारण्यात आला. या टोल नाक्याचा कंत्राट जी. एन. टिक्कर यांना एक कोटी 19 लाख रुपयांत देण्यात आले होते. टोल नाका सुरू केल्यावर काही दिवस स्वत: जी. एन. टिक्कर यांनी टोलवसुली केली. त्यानंतर शेगावचे माजी नगराध्यक्ष सत्यनारायण व्यास यांना तो चालवण्यासाठी दिला होता. जून 2004 ते डिसेंबर 2012 पर्यंत आठ वर्षे सहा महिने हा टोल नाका सुरू होता. दरम्यान, 2012 मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याविरोधात आंदोलन करून तोडफोड केली होती. त्यानंतर हा टोल नाका बंद पडला. तेव्हापासून आजपर्यंत या मार्गावर कुठलाही टोल नाका नसताना टोल नाका बंद करण्याचे आश्वासन कसे दिले, असा प्रश्न आहे. टोलसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.


मनसेचा कंत्राटदाराशी संपर्क
नाशिकच्या तीन-चार मनसे कार्यकर्त्यांनी शेगाव-बाळापूर मार्गावर संबंधित टोल नाक्याच्या कंत्राटदाराशी शुक्रवारी संपर्क साधला. तुमचा टोल नाका आहे का, असा प्रश्‍न मनसे कार्यकर्त्यांनी विचारला. त्यांनी नेमका कशासाठी साधला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

यादीतील इतर नाकेही बंद?
मनसे व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील जे 28 टोल नाके बंद करणार असल्याची यादी तयार करण्यात आली त्यातील सहा टोल नाके पूर्वीपासूनच बंद आहेत. आता मुख्यमंत्री पुन्हा ते टोल नाके कसे बंद करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


डिसेंबर 2012 पासूनच बंद
2003 मध्ये शेगाव-बाळापूर मार्गावरील टोल नाका मंजूर झाला. जून 2004 मध्ये हा टोल नाका सुरू झाला, डिसेंबर 2012 मध्ये बंद करण्यात आला. त्या ठिकाणचे सर्व साहित्यही काढण्यात आले. त्यामुळे गेल्या 14 महिन्यांपासून शेगाव-बाळापूर मार्गावर एकही टोल नाका नाही. - जी. एन. टिक्कर, तत्कालीन टोल नाका कंत्राटदार