आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : विनयभंगप्रकरणी शिक्षकांवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाभूळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक आर. बी. गजभिये आणि जीवशास्त्राचे एस. एस. रामटेके यांनी ४९ विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्याची तक्रार महिला आयोग व पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र, प्रयोगशाळा सहायकाचा कामचुकारपणा उघड केल्यामुळेच या दोघांविरोधात हे कारस्थान रचले गेले, असा आरोप दोन्ही शिक्षकांच्या पत्नी भारती रामटेके आणि पद्मा गजभिये यांनी बुधवारी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनात केला आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित मुलीचे जबाब घेतले आहेत. प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून या शिक्षकांवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
भारती आणि पद्मा यांनी निवेदनामध्ये म्हटले, नवोदय विद्यालयामध्ये शुभांगी कुर्वे प्रयोगशाळा सहायक आहेत. त्यांचे काम त्या व्यवस्थित करत नाहीत. आमच्या पतींनी त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यामुळे चिडून जाऊन कुर्वे यांनी काही जणांना हाताशी धरून विनयभंग केल्याची खोटी तक्रार दिली. यापूर्वी कुर्वे यांच्या भावाने आम्हाला फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
मंगळवारी कुर्वे, रामअवतार सिंग, वंदना धोपटे, कमलाकर धोपटे यांच्यासह १५ व्यक्तींसह आमच्या निवासस्थानांसमोर येऊन अश्लील शिवीगाळ केली तसेच धमकीही दिली. त्यामुळे या लोकांवरच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. नोकरीवरून काढून टाकण्यासाठी हा आपल्याविरुद्ध कट रचला गेला, असा आरोप शैलेश रामटेके आणि राजन गजभिये यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
दोन्ही शिक्षक फरारच

शिक्षक आर. बी. गजभिये आणि एस. एस. रामटेके यांनी ५५ मुलींचा विनयभंग करून लैंगिक शोषण केल्याची तक्रार विद्यालयाचे प्राचार्य रामतोर तपेश्वरसिंग यांनी बुधवारी पोलिस ठाण्यात दिली. त्या आधारे पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला असून हे दोन्हीही शिक्षक फरार आहेत.
शासन मुलींच्या पाठीशी

^हा प्रकार गंभीर आहे. मुलींचे जबाब नांेदवण्यात आले. त्याचा लवकरच अहवाल सादर होईल. मुलींनी खंबीर राहावे तसेच पालकांनीसुद्धा धैर्याने सामोरे जावे. शासन मुलींच्या पाठीशी आहे.
प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी.
तक्रार निवारण समिती नेमा

नवोदय विद्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी प्राचार्यांना सूचित केले आहे. प्राचार्यांनी तातडीने समिती गठित करण्याचे आश्वासन दिले आहे. ही समिती प्राप्त गोपनीय तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल.
प्राचार्य, मुलींचे जबाब

उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या नेतृत्वातील पथकाने बुधवारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व संबंधित ४९ मुलींचे जबाब नोंदवले. तसेच तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार पूजा माटोडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी नवोदय विद्यालय गाठून माहिती घेतली. यात मुलींनी शिक्षकांनी आमच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपाचा पुनरुच्चार केला.