आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यजीव विभागाच्या रडारवर तणमोर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हय़ातील तणमोरांच्या अस्तित्वाबाबत आता वन, वन्यजीव विभागही दक्ष झालेला आहे. जिल्हय़ातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती तसेच स्थानिकांमार्फत तणमोरावर आता वन, वन्यजीव विभागाची नजर राहणार आहे. तणमोराच्या अस्तित्वाविषयी दिव्य मराठीने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यावर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या स्वाक्षरीने सर्वांना पत्र पाठवून तणमोराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुर्मिळ तणमोर पक्षी अखेरच्या घटका मोजत असताना अकोला जिल्हय़ात असलेले त्याचे अस्तित्व निश्चितच गौरवास्पद आहे. मात्र, त्याच्याकडे आजवर फारसे कुणी लक्ष दिले नाही. वृत्तपत्रातून त्याच्या हालचालींचे वृत्त प्रकाशित व्हायचे तसेच कधी कुणाच्या छायाचित्रात तणमोर चित्रबद्ध होत होता.

कधी तो जखमी अवस्थेत आढळायचा. मात्र, तणमोराच्या अस्तित्वाची, त्याच्या अधिवासाची अधिकृत नोंद कुठेही ठेवलेली नाही. ती विखुरलेल्या अवस्थेत आहे. ती संकलित करून तणमोर व त्याच्या अधिवासाचा संपूर्ण अभ्यास करून माहिती संकलित करण्यासाठी वन, वन्यजीव विभागाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सिसा-मासा, उदेगाव, शिवणी, शिवर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यासारख्या ठिकाणी जेथे तणमोराचा अधिवास असण्याची शक्यता आहे, त्यावर बारीक लक्ष देण्यात येत आहे. वन, वन्यजीव विभागाचे कर्मचारी या कामी लागले आहेत. त्यांना इतरांचीही मदत मिळावी म्हणून या भागातील स्थानिकांनाही तणमोर आढळल्यास वा इतर माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हय़ातील निसर्गप्रेमी संस्था, व्यक्ती, मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर, सातपुडा फाऊंडेशनचे अमोल सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आदींसह अनेकांना पत्र पाठवून तणमोराच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. यात तणमोराच्या सखोल अभ्यासासाठी त्याच्या अधिवासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे तसेच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस या विषयावर महत्त्वपूर्ण सभा घेण्याचेही पत्रात म्हटले आहे.