Home | Maharashtra | Vidarva | Akola | akola police solved bandu giri murder case

पोलिसांनी उलगडला बंडू गिरी हत्याकांडाचा कट

प्रतिनिधी | Update - Sep 30, 2013, 11:45 AM IST

उमरी येथील माजी सरपंच महेंद्र उर्फ बंडू दिगांबर गिरी (पुरी) यांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम पोलिसांनी 29 सप्टेंबरला न्यायालयात कथन केला.

 • akola police solved bandu giri murder case

  अकोला- उमरी येथील माजी सरपंच महेंद्र उर्फ बंडू दिगांबर गिरी (पुरी) यांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम पोलिसांनी 29 सप्टेंबरला न्यायालयात कथन केला. गुन्ह्यातील दुचाकी, कपडे आणि इतरही साहित्य जप्त करणे आवश्यक असल्याने आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी मागणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास शेळके यांनी प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकारी के. के. शहा यांच्या न्यायालयात केली. अखेर न्यायालयाने आरोपींची 5 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. बंडू गिरीचा 27 सप्टेंबरला विदर्भ वाइन बारमध्ये खून करण्यात आला. याप्रकरणी बंडू यांचे भाऊ हेमंत पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी सुभाष उर्फ पिंटू इंगळे, बालू वानखडे, संदीप वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना 29 सप्टेंबरला पहाटे 4 वाजता अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. आरोपींकडून अँड. युसूफ नौरंगाबादी आणि अँड. दत्ता कदम यांनी युक्तिवाद केला.

  बालाजीचे दर्शन राहिले
  बंडू गिरी हत्याकांडानंतर पिंटू इंगळे आणि बालू वानखडे हे थेट वाशिम येथे गेले. त्यांनी तेथून तिरुपती येथे जाण्याचा बेत आखला. मात्र, हत्याकांडानंतरची परिस्थिती जाणून घेण्याची इच्छा होती तसेच त्यांना पुढील प्रवासासाठी पैसे हवे होते. मात्र, पोलिसांची रणनीती यशस्वी झाल्याने आरोपींचा पुढील बेत फसला.

  परिचितांची मदत ठरली मोलाची.
  पोलिसांनी उमरी परिसरातील एका युवकाला हाताशी धरून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. आरोपींचे लोकेशन पातूर-मालेगाव रोडवर मिळाले. सहायक पोलिस निरीक्षक कैलाश शेळके, एएसआय जयबीरसिंग ठाकूर, अश्विन मिर्शा, पप्पू ठाकूर, नीलेश खंडारे यांनी युवकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी एका धाब्यावर ट्रॅप लावला. पोलिसांना पाहताच आरोपी शरण आले.

  दबावतंत्र ठरले फलदायी
  पोलिसांनी छावा संघटनेचे पदाधिकारी सुधाकर पाटील यांची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर इतर दोन आरोपींच्या अटकेसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. पोलिसांची ‘प्रेशरपॉलिसी’ फलद्रूप ठरली. आरोपींना पातूरकडे बोलावण्यात आले. तेथेच त्यांना अटक केली गेली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

  आरोपी छावाचा
  बंडू गिरी हत्याकांडातील आरोपी सुभाष इंगळे हा छावा संघटनेचा शहर संघटक आहे. 28 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत छावाचे इतर पदाधिकारी सिव्हिल लाइन्स चौकाजवळ चर्चा करत होते. तसेच 29 सप्टेंबरला न्यायालयातही काही पदाधिकारी इंगळेच्या भेटीसाठी आले होते.

Trending