आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊंडीग फेअर ऑफमुळे होतेय रेल्‍वे प्रवाशांची लुट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सुट्या पैशांमुळे रेल्वे तिकीट खिडकीवर वादाचे प्रसंग नेहमीच उद्भवत होते. परिणामी, यावर तोडगा काढण्यासाठी प्रवाशांना फटका बसणारा विचित्र निर्णय घेण्यात आला आहे. सुटे पैसे नाहीत म्हणून होणारी कटकट टाळण्यासाठी रेल्वेने देशभर ‘राउंडिंग ऑफ फेअर’चा अवलंब केला आहे. रेल्वेने निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक रक्कम ग्राहकांच्या खिशातून जात आहे. यामुळे ग्राहकांचा खिसा कापला जात असला, तरी रेल्वेला कोट्यवधी रुपयांची वरकमाई होत असल्याचा अंदाज आहे. रेल्वेने अंतरानुसार ठरवलेले मूळ भाडे जर 12, 13, 14 रुपये असेल, तर ‘राउंडिंग ऑफ फेअर’ पद्घतीमुळे प्रवाशांना त्यासाठी 15 रुपये द्यावे लागतात.

त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून एका तिकिटावर कधी तर 1 ते 3 रुपये निर्धारित दरापेक्षा जास्त घेतले जातात. देशभर हा प्रकार चालू असल्याने, त्यातून कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त कमाई रेल्वेला होत आहे. प्रत्यक्षात प्रवाशांना त्याचा कुठलाही लाभ नाही. रेल्वेचे 1 ते 5 कि़ मी़ अंतरासाठी 3 रुपये भाडे आहे. पण, ‘राउंडिंग ऑफ फेअर’मुळे त्यासाठी 5 रुपये द्यावे लागतात. त्याचप्रमाणे 21 ते 25 कि़ मी़ अंतराचे निर्धारित भाडे 6 रुपये आहे. पण, प्रत्यक्षात 10 रुपये घेतले जात़े 51 ते 55 कि़ मी़ साठी 12 रुपये आहे, ते 15 रुपये आकारले जाते.

दर निश्चित केल्याची काही उदाहरणे पॅसेंजर गाडीच्या वेळापत्रकात सापडतात़ या भाडे पद्घतीबाबत बहुतांश जणांना माहिती नाही आणि ज्याला आहे ते बोलायला तयार नाहीत. केवळ सुटे पैसे नाहीत म्हणून वरचे पैसे घेण्याची ही पद्घत म्हणजे प्रवाशांची लूट आहे, असा आरोप होत आहे.

भुसावळ विभागात अकोला मोठे महसूल देणारे रेल्वेस्थानक आहे. अकोला रेल्वेस्थानक मध्यवर्ती असल्याने इतर जिल्ह्यांचे प्रवासीही येथून प्रवास करतात. ‘राउंडिंग ऑफ फेअर’मुळे प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असले, तरी त्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रवासी संख्येची वाढती संख्या तुलनेत कमी गाड्यांमुळे प्रवासी गाड्यांचे अक्षरश: कोंडवाडे होत आहेत. रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रत्येक रेल्वेगाडीमध्ये हे दृष्य आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून अप आणि डाउन मार्गावर एकूण 130 रेल्वेगाड्या जातात. त्यांपैकी 38 गाड्या नियमित आहेत. 82 गाड्या सप्ताहातून एक, दोन, तीन किंवा चारवेळा फेर्‍या आहेत. 10 हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू आहेत. अकोला रेल्वेस्थानकावरून दररोज 11 हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांपैकी आठ हजार 500 सर्वसामान्य दर्जाचे प्रवासी आहेत, तर दोन हजार 500 विद्यार्थी आरक्षण काढून अकोल्यातून प्रवास करतात. सणासुदीच्या काळात प्रवासी संख्येचा आकडा वाढून तो 12 हजारांपर्यंत जातो. दररोज सरासरी 20 लाखांची उलाढाल रेल्वेस्थानकावरून होते. एका प्रवाशाकडून ‘राउंडिंग ऑफ फेअर’मुळे एक रुपया जरी अतिरिक्त घेतला, तरी अकोला रेल्वेस्थानकावरून दररोज किमान 12 हजार रुपये रेल्वेला अतिरिक्त मिळत असल्याची माहिती आहे. देशातील हा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे.
भाड्यापेक्षा अधिक रक्कम ग्राहकांच्या खिशातून

प्रवासी संघटनेचे दुर्लक्ष : विशेष म्हणजे ‘राउंडिंग ऑफ फेअर’ला अजून प्रवासी वा संघटना यांनी कोणीही विरोध केलेला नाही. प्रवाशांच्या होणार्‍या लुटेकडे संघटनांनीही दुर्लक्ष केले आहे.

पॅसेंजर, इंटर सिटी, एक्स्प्रेस, मेल, सुपर फास्ट, गरीब रथ, ए. सी. डीलक्स. या प्रकारच्या गाड्या रेल्वेस्थानकावरून जातात.

  • एकूण गाड्या (अप-डाउन) 130
  • नियमित गाड्या 38
  • साप्ताहिक गाड्या 82
  • हॉलिडे स्पेशल गाड्या 10
  • दररोजची सरासरी प्र. संख्या 11 हजार


सुट्या पैशांमुळे होणारा वाद टाळण्यासाठी प्रवासी तिकिटात ‘राउंडिंग ऑफ फेअर’चा निर्णय घेतला. यामुळे सुट्या पैशांवरून होणारा वाद टळला असला, तरी त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. भाड्यापेक्षा ‘राउंडिंग ऑफ फेअर’मुळे अधिक पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक तिकिटावर 1 ते 3 रुपयांचा बोजा पडत आहे.

अशी होते लूट
अंतर कि.मी. निर्धारित दर नंतर दर
1 ते 5 3 रुपये 5 रुपये
21 ते 25 6 रुपये 10 रुपये
51 ते 55 12 रुपये 15 रुपये

दरवाढीचे षड्यंत्र
प्रवाशांना सुविधा न देता अप्रत्यक्षरीत्या ही दरवाढ प्रवाशांवर लादली गेली आहे. केंद्र शासन लुटण्यासाठीच बसले आहे. प्रवाशांची ही लूट अन्यायकारक असून, याविरोधात रेल्वेमंत्र्यांना पत्र देऊन लूट थांबवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.’’ खासदार संजय धोत्रे, अकोला

लूट थांबली पाहिजे
केंद्र शासनाने चिल्लर उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अशा प्रकारे प्रवाशांना लुटणे योग्य नाही. ही लूट थांबवण्यासाठी मंत्र्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार आहे. प्रवाशांची होणारी लूट थांबली पाहिजे.’’ डॉ. रवी आलिमचंदानी, अध्यक्ष विदर्भ यात्री संघ

  • रेल्वेला होतेय कोट्यवधी रुपयांची वरकमाई
  • ‘राउंडिंग ऑफ फेअर’मुळे होतेय रेल्वे प्रवाशांची लूट!
  • रेल्वेचा प्रवाशांना आर्थिक फटका बसणारा विचित्र निर्णय
  • तिकिटावर 1 ते 3 रुपये दरापेक्षा जास्त घेतले जातात