आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Residents Celebrates On Eve Of Appointing Shrikar Pardeshi At PMO

'हिरव्या मना'चा असाही अधिकारी ! डॉ. परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयाच्या उपसचिवपदी नेमणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: डॉ. श्रीकर परदेशी
अकोला - साधी राहणी, उच्च विचार, सातत्याने नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेणारा अन् सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारा हिरव्या मनाचा अधिकारी म्हणून २००७ ते २००९ दरम्यान अकोलेकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले डॉ. श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयाच्या उपसचिवपदी नेमणूक झाल्याचे वृत्त कळले अन् अकोलेकरांना त्यांच्या कार्यकाळातील अनेक प्रसंगांची आठवण झाली.

डॉ. श्रीकर परदेशी यांच्यारूपाने १९ मे २००७ रोजी अकोल्यात एक चांगला, प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी रुजू झाला अन् अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांनी त्या पूर्णत्वास नेण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला. डॉ. श्रीकर परदेशींच्या कार्यकाळातच नरनाळा महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. हिरव्या मनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्यातील निसर्ग चळवळीतील मंडळीला एकत्र करून अकोल्याच्या नैसर्गिक वारशाचे, जैवविविधतेचे जतन व्हावे, येथील पर्यटनास चालना मिळावी, जिल्ह्यातील नरनाळा हा मुंबई, पुण्याच्या नजरेस पडावा, म्हणून नरनाळा पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित केले. त्यानुसार
२००८मध्ये पहिला नरनाळा महोत्सवही थाटात अन् अकोलेकरांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. पहिल्या आयोजनातील त्रुटी दूर करून दुसऱ्या वर्षी त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर नरनाळा महोत्सवात पर्यटक, निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला. त्यानंतर नरनाळा महोत्सवाची अकोलेकरच नव्हे तर वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावतीमधील नागरिक प्रतीक्षा करू लागले. दरम्यान, श्रीकर परदेशी यांनी राबवलेल्या चार अभूतपूर्व उपक्रमांची दखल त्या वेळी राज्य शासनाने घेतली अन् अकोल्यातून सुरू झालेले ते चारही प्रकल्प राज्य स्तरावर राबवण्यात आले. त्यांच्या असे लक्षात आले, की जिल्ह्यातील चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीत अत्यल्प टक्केवारी म्हणून त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ‘संकल्प शिष्यवृत्ती’चा उपक्रम राबवत टक्केवारी वाढवण्यावर भर दिला. राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत नोंदणी झालेल्या शाळांमधून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येतात. अशा उपक्रमांमधून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शाळांना पंचतारांकित हरित शाळा पुरस्कारही त्यांच्याच कार्यकाळाची देण. शासनाची कुठलीच मदत घेता केवळ लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्याचा उपक्रम राबवत त्यांनी जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधले. वृक्षारोपण संवर्धनावरही त्यांनी विशेष भर दिला. म्हणून त्यांनी निसर्ग संवर्धन चळवळ नावाचे व्यासपीठ साकारले होते. या निसर्ग संवर्धन चळवळीत प्रशासकीय अधिकारी, पोलिस विभाग, अभ्यासक, विद्यार्थी, तज्ज्ञ यांसह सर्वांचा सहभाग होता. तर अकोल्यात राबवण्याचा विचार असलेले कॉपीमुक्त अभियान पटपडताळणी अभियान अचानक बदली झाल्याने त्यांनी नांदेडमध्ये राबवले अन् त्यासही राज्य स्तरावर मोठे यश मिळाले.

डॉ. श्रीकर परदेशी
मुलाला सामान्यांप्रमाणे दिली होती वागणूक
अत्यंतसाधी राहणी असणाऱ्या श्रीकर परदेशींंनी नरनाळा महोत्सवात सहभागी झालेल्या आपल्या मुलाची सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे नोंदणी करून पैसे भरले. कनादने गतवर्षी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवले.

एक लाख विद्यार्थ्यांचे त्रिवार वंदन
२००७मध्ये अकोल्यातील क्रीडांगणावर आयोजित त्रिवार वंदन कार्यक्रमात ३१ हजार विद्यार्थी तर जिल्हाभरात एकूण लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सामान्य ज्ञान, निबंध यांसारख्या स्पर्धाही वर्षभर राबवल्या.