आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोपचारमध्ये दिले जातेय निकृष्ट अन्न !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी, 20 फेब्रुवारीला केलेल्या पाहणीत येथे मेसमध्ये निकृष्ट अन्नधान्य, तीन दिवसांपूर्वीचे दही आणि मांजरीचा मुक्तसंचार आढळला. याप्रकरणी मनविसेने दिलेल्या तक्रारीवरून अन्न, औषध प्रशासनाने येथील खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत.

सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांच्या आहारासाठी मेस चालवली जाते. रुग्णांना दिले जाणारे येथील भोजन सरकारी निकषाप्रमाणे असावे, असा दंडक आहे. मात्र, या मेसमधील अन्न निकृष्ट असल्याचे अनेक वेळा आढळले. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची माहिती गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांना मिळाली. मनविसेच्या पदाधिकार्‍यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे या प्रकारची तक्रार देऊन अधिकार्‍यांसह रुग्णालयाच्या मेसची पाहणी केली. या पाहणीमध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. या वेळी मेसमध्ये उघड्यावर ठेवलेल्या दुधाभोवती मांजर घुटमळत असल्याचे आढळले. मनविसेच्या कार्यकर्त्यांना गहू, तांदूळ, रवा आणि डाळींमध्ये भुंगे आढळले. येथे निकृष्ट आहाराबाबत तक्रार आल्याने मनविसेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांच्या नेतृत्वात कामगार जिल्हाध्यक्ष सौरव भगत, शहराध्यक्ष ललित यावलकर, सतीश फाले, मंगेश तराळे, आशीष कुळकर्णी, अंकुश टापरे, विकास मोळके, दिनेश देशमुख, अविनाश कोकरे, शेख नमाल, राजू महाजन, सचिन गायकवाड, निखिलेश गवई, राकेश शर्मा यांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली होती.

दही फेकणार होतो, पण विसरलो
सवरेपचार रुग्णालयातील मेस प्रभारी डॉ. नाझनिन अफसर खान यांच्या उपस्थितीत पाहणी केली. त्या वेळी दह्याच्या डब्याचे झाकण उघडल्यावर त्यात डास असल्याचे दिसून आले. या दह्याबाबत विचारणा केली असता, दही केव्हाचे आहे, हे कुणालाच सांगता आले नाही. या वेळी ‘साहेब, ते दही फेकून द्यायचे होते. पण विसरलो’, असा बचाव एका कर्मचार्‍याने केला. यावर डॉ. नाझनीन खान म्हणाल्या, ‘साहेब जाऊ द्या हो. असे दही आम्ही वापरत नाही.’

मनविसेमुळे रुग्णालयाचे निकृष्ट जेवण चव्हाट्यावर
रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचा आरोप रणजित राठोड यांनी केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने एकूण 24 नमुने प्रमाणीकरणासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत.

अन्न, औषध प्रशासनाने घेतले नमुने : रुग्णालयातील मेसमध्ये अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी अन्न निरीक्षक नीलेश ताथोड यांच्या चमूने मेसची तपासणी केली. त्यांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. उघड्यावर असलेल्या दुधाशेजारी घुटमळणारे मांजर व चार दिवसांपूर्वीचे दही दिसून आले. त्यांनी दही, भाजी, पीठ, गहू, रवा, साखर, डाळी, भाजीमध्ये टाकण्यासाठी अनेक दिवसांपासून बनवून ठेवलेली करी, चिली पावडर आदींचे नमुने घेतले.

कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू
रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍यांवर तत्काळ कारवाई करा. गोरगरिबांवरील अन्याय खपवून घेणार नाही. दोषींवर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. रणजित राठोड, जिल्हाध्यक्ष मनविसे.

सरकारी यंत्रणाच धान्य पुरवते
मेसमध्ये सरकारी नियमानुसार धान्याचा पुरवठा सरकारी यंत्रणेद्वारा पुरवल्या जातो. धान्य निकृष्ट असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही. अन्न प्रशासनाने अस्वच्छ धान्याचे नमुनेच घेतले आहेत. मेसच्या चुका असतील तर चौकशी केल्या जाईल. डॉ. राजेश कार्यकर्ते , प्रभारी अधिष्ठाता

मेसमध्ये काळजी घेतल्या जाते
मेसमध्ये बनवले जाणारे जेवण उत्तम आहे. स्वच्छतेचीसुद्धा काळजी घेतल्या जाते. आज काही चुकून राहिले असेल. पण, दररोज तसे होत नाही. मेसमध्ये असलेली मांजर ही पाळीव आहे. मेस बंद झाल्यावर तिला बाहेर काढून देण्यात येते. रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण दिल्या जाते. डॉ. नाझनीन अफसर खान, आहारतज्ज्ञ, मेस प्रमुख