आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार : वेबसाइट बिघाडाने नाही दोन वर्षांपासून ‘रोजगार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रोजगार व स्वयंरोजगार विभागाची वेबसाइट तांत्रिक बिघाडामुळे खराब झाली आहे. याकडे अधिकार्‍यांचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून रोजगारासाठी एकाही विद्यार्थ्याला संदेश प्राप्त झाला नाही.

नोकरीसाठी संधी उपलब्ध व्हावी, या अपेक्षेने हजारो विद्यार्थी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करतात. या कार्यालयांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महा ई-सेवा केंद्र, तंत्रशिक्षण महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते. राज्यातील विविध 45 रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून उमेदवारांना सेवा पुरवल्या जातात. रोजगार सेवा मोफत आणि सहज उपलब्ध व्हावी, या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी आपले नाव रोजगार व स्वयंरोजगार विभागामध्ये नोंदणी करण्यासाठी धडपड करतो. मात्र, उमेदवारांच्या आशांवर रोजगार विभागाने पाणी फिरवले असून, नोंदणी करण्यापलीकडे कोणतेही काम होत नाही. शासनाच्या तसेच खासगी संस्थांच्या मोठय़ा प्रमाणात नोकरीविषयक जाहिराती आपल्याला पाहावयास मिळाल्या. तरीसुद्धा शासनाच्या रोजगार विभागाकडून कोणताही कॉल का आला नाही ? असा प्रश्न उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.

यंत्रणा निकामी ठरत आहे
2009 मध्ये इयत्ता 12 चा शिक्षणक्रम पूर्ण केला. सध्या पदवीचे शिक्षण सुरू आहे. 8 नोव्हेंबर 2009 रोजी आज जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी नोकरीसाठी कुठलाही संदेश मोबाइलवर आला नाही. त्यामुळे ही यंत्रणा निकामी ठरत असल्याचे दिसते.
कुशल प्रमोद सोनटक्के, विद्यार्थी.’’

कोणताही कॉल नाही
2012 मध्ये बीएस्सी बीएड झालो. नोकरीच्या अपेक्षेने रोजगार विभागात 1 मे 2012 रोजी नोंदणी केली. मात्र, अद्यापही नोकरीविषयक कोणत्याही प्रकारचा कॉल विभागाकडून आलेला नाही. ’’
अझहर खान मासूम खान, विद्यार्थी.

वेग येण्यासाठी प्रयत्न
3 जानेवारी 2013 पासून रोजगार व स्वयंरोजगार विभागाची वेबसाइट मंदावली आहे. शासनाच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयात वेबसाइट डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. त्यामुळे उमेवारांना एसएमएस येणे बंद झाले असावेत. याबाबतची माहिती त्वरित मुंबई वरिष्ठ कार्यालयाला कळवून कामाला वेग कसा येईल, यासाठी प्रयत्न करतो. ’’
अ. र. पाईकराव, प्रभारी सहायक संचालक, रोजगार