आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या पत्रांचे वाचन; सैनिकांच्या घरासमोर काढली रांगोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घ्याव्यात, त्यांच्यासोबत स्वातंत्र्य दिन साजरा करावा, अभ्यासक्रमातील पाठ, कविता तसेच चित्रपटांमधून भेटणार्‍या शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटावे, त्यांच्याप्रति कृतज्ञतेची भावना जागवावी म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटी व न्यू इंग्लिश हायस्कूलच्या वतीने स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला शहिदांना आगळेवेगळ्या पद्धतीने अभिवादन
करण्यात आले.

सैनिकांचे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख असणार्‍या पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ज्युनिअर रेडक्रॉस पथकाने रेडक्रॉस सोसायटीच्या ‘आरोग्य, सेवा, मैत्री’ या ध्येयानुरूप हा कार्यक्रम घेण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर शहीद कैलास निमकंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शहीद कैलास यांची स्मृतिचित्रे, त्यांनी सीमेवरुन पाठवलेली पत्रे आदी पाहिलीत. त्यानंतर गावकर्‍यांकडून तेथील सैनिकांच्या घरांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरासमोर रांगोळ्यांनी अंगण सुशोभित करीत दीप प्रज्वलन केले. या कुटुंबांना व गावकर्‍यांना यानिमित्ताने वेगळीच अनुभूती आली. सायंकाळी शहीद कैलास निमकंडे यांच्या स्मारकात श्रद्धांजलीसाठी सर्व जण एकत्र जमले. यामध्ये निमकंडे कुटुंबीय, प्रतिष्ठित नागरिक, सैन्यातून रजेवर आलेले सैनिक यांची उपस्थिती होती. विद्यालयाचे ज्युनिअर रेडक्रॉस समुपदेशक हेमंत ओझरकर यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. विद्यालयाचे विज्ञान पर्यवेक्षक रेलकर, रेडक्रॉसच्या कीर्ती मिश्रा यांनी शहीद कैलास निमकंडे यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी हर्षल खंडारे, सूरज गवई यांची विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यास प्रेरणा देणारी भाषणे झाली. मा. सु. मुन्शी यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. शाहीर देवानंद गवई यांनी गीत सादर केले. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कुशल भिडे, पथकप्रमुख सौरभ चव्हाण, सागर फडणीस, यश दुबे यांनी पुढाकार घेतला.
फोटो - इंडियन रेडक्रॉस सोसायटी व न्यू इंग्लिश हायस्कूलच्या वतीने शिर्ला येथील शहीद कैलास निमकंडे यांच्या घरी जाऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.