आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवणी विमानतळ धावपट्टीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिवणी विमानतळासाठी लागणार्‍या वाढीव जागेच्या प्रश्नावरून विद्यापीठ प्रशासन आणि कार्यकारी परिषदेतील सदस्यांमध्ये धुमशान सुरू असल्याचे चित्र आहे. शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासन राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजूकडील जागा देण्यासाठी तयार झाले आहे. यामुळे विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.

अकोल्यासह विदर्भातील काही लोकप्रतिनिधी अकोल्यात विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सद्य:स्थितीत कृषी विद्यापीठ प्रशासनाने बोरगाव मंजूकडील राष्ट्रीय महामार्गाजवळची जागा देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाबाबत तोडगा निघून पुढील प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. बोरगाव मंजू-सोनाळा येथे कृषी आणि पशुवैद्यकीय विद्यापीठाची सुमारे 1600 एकर जमीन आहे. येथे नव्याने विमानतळ उभारणीसाठी आवश्यक जमीन सहज उपलब्ध होऊ शकते. बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्ग सहावर असून, अकोल्यापासून सुमारे 22 कि.मी. वर आहे. त्यामुळे या भागात विमानतळाचे विस्तारीकरण केल्यास सोईस्कर ठरू शकते. कृषी विद्यापीठाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍यांनी स्थापन केलेल्या विदर्भ कृषी विकास मंचानेही ही जागा योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

अधिवेशनाने दिला वेग
अकोला-शिवणी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात चांगलाच गाजला. विदर्भातील लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे कृषी विद्यापीठ प्रशासनाने शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा देण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो.

विमानतळ प्राधिकरणाची तयारी नाही
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बोरगाव येथील जागा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी विमानतळ प्राधिकरणाची मात्र यास तयारी नाही. कृषी विद्यापीठाच्या बोरगाव येथील जागेवर नवीन धावपट्टीची गरज पूर्ण होऊ शकते. परंतु, शिवणी ते बोरगाव हे अंतर सुमारे 13 कि.मी. असून, विमानतळ प्राधिकरणास जागेचा सलग पट्टा उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रस्तावास विमानतळ प्राधिकरण राजी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विकासास मारक ठरू शकते
शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण केल्यास ते विद्यापीठाच्या संशोधन व शैक्षणिक विकासास मारक ठरू शकते.’’ डॉ. बळवंतराव बथकल, अध्यक्ष, विदर्भ कृषी विकास मंच (व्हार्ट-डार्स) अकोला.

आदेशानंतर कारवाई
शिवणी विमानतळ धावपट्टीच्या नकाशासह मूल्यांकनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाने राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर शासनाचे आदेश प्राप्त होताच पुढील उचित कारवाई करण्यात येणार आहे.’’ एम. डी. शेगावकर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी.

‘हायवे ब्लॉक’कडील जागा देण्यास तयार
विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. उलट आम्ही पर्यायी जागा म्हणून 75 हेक्टरवरील ‘हायवे ब्लॉक’कडील जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.’’ ज्ञानेश्वर भारती, कुलसचिव, कृषी विद्यापीठ