आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्काय बस' जमिनीवरच,पुढील कार्यवाहीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यात सर्वप्रथम ‘स्काय बस’ सुरू करण्याचा मान अकोला शहराला मिळणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘स्काय बस’च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रस्ताव मंजूर होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असून, प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केल्याने ‘स्काय बस’ जमिनीवरच आहे.

महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहरविकासाच्या विविध योजना राबवण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे झाला. मात्र, आतापर्यंत राबवण्यात आलेल्या योजनेत सर्वात मोठी आणि राज्यात सर्वप्रथम अकोल्यात सुरू होणारी ही योजना ठरली आहे. विशेष म्हणजे, ही योजना सुरू करण्यासाठी महापालिकेला कोणताही खर्च नाही.

मनपाने सुरू केलेली अकोला शहर बस वाहतूक, सूर्योदय प्रकल्प, जैविक घनकचऱ्यातून खतनिर्मिती, नवजीवन प्रकल्प राज्यात आदर्श ठरले होते. त्यामुळे स्काय बस योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाल्यास अकोला महानगरपालिकेच्या नावलौकिकात भरच पडणार आहे. त्याचा फायदाही शहरवासीयांना मिळणार आहे. महानगरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी मेट्रो मोनो रेलचा वापर सुरू झाला आहे. याच धर्तीवर लहान मध्यम शहरासाठी ‘स्काय बस’ (कॅब-लहान वाहन)चा वापर काही देशांनी सुरू केला आहे. ही योजना शहरात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बांधा, वापर हस्तांतरित करा, या तत्त्वावर आहे. गणेश इनोवेशन अकोला या कंपनीने प्राथमिक अहवाल महापालिकेकडे सादर केल्यानंतर १८ जुलैच्या महासभेत स्काय बसच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ही प्रायोगिक तत्त्वावर रेल्वेस्थानक ते मदनलाल धिंग्रा चौक (बसस्थानक) या १.६ किलोमीटरच्या मार्गावर राबवली जाणार आहे. कंपनी या योजनेच्या उभारणीचा संपूर्ण खर्च स्वत: करणार आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली. वाहने ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे घरात वाहन असतानाही वाहन रस्त्यावर आणणे अवघड झाले आहे. ही समस्या केवळ मुंबई, दिल्ली आदी मेट्रो सिटींपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या समस्येने अकोला शहरासारख्या लहान मध्यम शहरांनाही घेरले आहे. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही प्रशासनाने करणे अपेक्षित होते. परंतु, या प्रस्तावाला मंजुरी मिळून अडीच महिन्यांच्या कालावधी झाला आहे. महासभेने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने ‘स्काय बस’साठी निविदा बोलावणे गरजेचे आहे. अडीच महिन्यांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असती. त्यामुळे निरुत्साह दाखवला असल्याची चर्चा आहे.

प्रस्ताव सादर केला होता
स्काय बसचा प्रस्ताव मनपाकडे सादर केला होता. परंतु, अद्याप पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही.'' बी.एस. देशमुख, संचालक,गणेश इनोवेशन अकोला

तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ
‘स्कायबस’ची योजना राबवणे शक्य आहे का? याची पडताळणी करावी लागेल. या संबंधात तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.'' - डॉ.महेंद्र कल्याणकर, आयुक्त,अकोला महापालिका

घोडे अडले कुठे ?
प्रशासनाला‘स्काय बस’बाबत केवळ निविदा बोलवायच्या आहेत. निविदा प्रसिद्ध करण्याव्यतिरिक्त महापािलकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही, तरीही एखाद्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करू नये, ही बाब सर्वत्र आश्चर्याचा विषय बनली आहे. त्यामुळेच ‘स्काय बस’चे नेमके घोडे अडले कुठे? अशी चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.