अकोला - शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यावर कापशी प्रकरणाचा ठपका ठेवत, त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांच्या बदलीच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, अंतिम निर्णय बाकी आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी "दिव्य मराठी'शी ते बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले की कापशी येथील घटना निंदनीय आहे. हे प्रकरण मी स्वत: हाताळले. कापशी येथे गेलो. त्या गावाची पाहणी केली. त्यानंतर चौकशी समिती नेमली होती. त्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवालात
आपले कार्यक्षेत्र सोडून कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांवर ठपका ठेवण्यात आला. हा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. त्या अहवालात पोलिस अधिकारी डॉ. मुंढे दोषी असल्याचे नमूद केले असून, त्यांच्या बदलीची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पोलिस अधिकार्यांच्या बदलीवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीही केली. तीन-चार दिवसांत शहराला चांगला सक्षम अधिकारी देण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान घटनेनंतर डॉ. प्रवीण मुंढे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. अक्षयतृतीयेच्या रात्री कापशी येथे पोलिस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. या वेळी पोलिसांनी गावकर्यांना जबर मारहाण केली होती.