आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू स्क्रीनिंग सेंटर कार्यान्वित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोल्यातील बालिकेला झालेल्या स्वाइन फ्लूबाबत दैनिक दिव्य मराठीने बुधवार, 19 फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित करताच जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली. गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वाइन फ्लू स्क्रीनिंग सेंटर सुरू होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली.

स्वाइन फ्लू झालेल्या शहरातील चार वर्षीय बालिकेवर सध्या नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ने आरोग्य यंत्रणेला दिल्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच प्रशासन कार्यान्वित झाले होते. बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी याची दखल घेत आरोग्य यंत्रणेला तातडीने उपाययोजना सुरू करण्याची सूचना दिली. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी व अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाने संयुक्तपणे स्वाइन फ्लू निवारणार्थ उपाययोजनांबाबत निर्देश दिले आहेत. दरम्यान, स्वाईन फ्लू बाधित बालिका राहत असलेल्या व्हीएचबी कॉलनी व न्यू तापडिया नगर या भागांची पाहणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागपुरात उपचार घेणार्‍या बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील रुग्णालयाने स्पष्ट केले.

लक्ष देण्याची गरज
शहरात व जिल्ह्यात सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचे दिसते. या अस्वच्छतेमुळे काही संसर्गजन्य आजार पसरतात. आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे चित्र सध्या आहे. शहरातील विविध भागांमध्ये कचर्‍याचे ढीग पसरले आहेत. महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून कामगिरी बजावण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसते. शहरातील काही भागांत साचलेले पाणी सडल्याने दुर्गंधी पसरली आहे. या सर्व प्रकाराकडे महापालिका आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रकरणाची चौकशी : ऑर्बिट रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पाठवून त्या बालिकेचे केसपेपर ताब्यात घेतले आहेत. प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख यांनी दिली. नागपूर महापालिकेला रुग्णाविषयी माहिती देण्यात आली आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालय संचालकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. स्वाइन फ्लू संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तत्काळ शासकीय यंत्रणेला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पाठपुरावा सुरू : साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाची चमू तयार केली आहे. शहरातील विविध भागांची पाहणी सुरू आहे. शहरातील कचरा तत्काळ उचलण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाला माहिती दिली आहे. - डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, अकोला.

हे करू नये : रुग्णाने तोंड उघडे ठेवू नये. रुग्णाचा टॉवेल, साबण आदी वस्तू इतरांनी वापरू नये. संक्रमणमुक्त होईपर्यंत रुग्णाने गर्दीत फिरण्याचा आग्रह धरू नये.