आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू : व्ही.एच.बी. कॉलनीची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला शहरात स्वाइन फ्लू रूग्ण आढळल्याने खडबडून जाग आलेल्या आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. आज अकोला महापालिका साथरोग अधिकार्‍यांनी व्ही.एच.बी. कॉलनीचा दौरा करून स्वाइन फ्लूच्यादृष्टीने पाहणी केली. अधिकार्‍यांच्या या पाहणीत व्ही.एच.बी. कॉलनीत पाण्याच्या टाकीतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले.

व्ही.एच.बी. कॉलनीतील सुमारे 680 लोकांची विचारपूस महापालिका साथरोग अधिकार्‍यांनी केली. यात स्वाइन फ्लूू सदृश आजाराचे लक्षण सांगणारा कुणीही आढळला नाही, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी दिली. गुरुवारी या भागातील रमेश गुडगे, अँड. निशिकांत फुरसुले, पुरुषोत्तम खंडेलवाल, जयर्शी इंगळे, चंदाताई अंबुलकर यांच्याकडे विचारपूस केल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली. महापालिकेच्या दहा लोकांच्या पथकात डॉ.फारुख शेख, डॉ.यू.डी.सोनोने, एस.आर.पोतदार, एस.एम. शिरसोदे यांचा समावेश होता.

‘ती’च्या प्रकृतीत सुधारणा
स्वाइन फ्लू झालेल्या अकोल्यातील बालिकेवर योग्य उपचार सुरू आहेत. उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे नागपुरातील खासगी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र चांडक यांनी सांगितले.

या भागात पाहणी केली
या भागात स्वाइन फ्लूची तक्रार आल्यानंतर आम्ही पाहणी केली. भागातील नागरिकांमध्ये काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत काय, याची चाचपणी केली. महापालिका साथरोग अधिकारी याविषयीचा अहवाल त्वरित देतील. डॉ. फारुख शेख, आरोग्य अधिकारी.

अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश
स्वाइन फ्लूबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश दिले. याबाबत गुरुवारी 20 फेब्रुवारीला सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संशयित रुग्णांची तपासणी सुरू झाली आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आदेश
स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यावर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यांनी सर्वेक्षण करून अहवाल पाठवण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. रमेश निकम, साथरोग विभागप्रमुख, आरोग्य उपसंचालक कार्यालय, अकोला.

आरोग्य पथकांकडून तपासणी : शहर तसेच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांकडून तपासणी केली जात आहे. शासकीय रुग्णालयामध्ये सुरू झालेल्या स्क्रीनिंग सेंटरमधून गुरुवारी तपासणी करण्यात आली. दिवसभरात जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधून 39 रुग्णांनी तपासणी करून घेतली. अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी तालुक्यात ठिकठिकाणी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला, हगवण या आजाराचे रुग्ण स्क्रीनिंगदरम्यान आढळले. रुग्णांवर आवश्यक तो उपचार सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

माझ्या मुलीच्या तब्येतीत सुधारणा
माझ्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ती लवकरच बरी होईल. अकोल्यातील जनतेने दिलेला धीर आणि दैनिक दिव्य मराठीने वास्तव समोर आणून जनतेला सजग केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सामाजिक जाणिवेतून इतरांना लागण होऊ नये यासाठी झालेला हा प्रयत्न आहे. आमचे हितचिंतक, डॉक्टर, महापालिका प्रशासन व नातेवाइकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. ‘त्या’ बालिकेची आई

पाणी गळती बंद करा
महापालिकेने टाकीतून होणारी गळती त्वरित बंद करावी. या भागात पाणी साठते व तिथे डुकरांचे वास्तव्य असते. पाण्याच्या गळतीमुळे गटाराचे पाणी पुन्हा पाइपलाइनमध्ये आल्याने पाणी दूषित होते. त्यामुळे येथील गळती बंद केली जावी. बाळ टाले, नगरसेवक, भाजप.