आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Ujjain Passenger RST Scroll By Three Coaches From Rula

अकोला-उज्जैन पॅसेंजर गाडीचे तीन डबे रुळावरून घसरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्यावरून उज्जैनकडे जाणार्‍या फास्ट पॅसेंजरचे इंजिनसह तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना उगवा रेल्वेस्थानकावर आज 10 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नांदेड विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी युद्धस्तरावर कार्य करून सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास मार्ग सुरळीत केला. या अपघातामुळे अकोला-खंडवा मीटरगेज मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे एक पॅसेंजर रद्द करण्यात आली, तर इतर गाड्या उशिराने धावल्या.
52974 क्रमांकाची अकोला-उज्जैन फास्ट पॅसेंजर अकोला रेल्वेस्थानकावरून आज सकाळी 5.30 वाजता उज्जैनसाठी रवाना झाली. अकोला रेल्वेस्थानकानंतर अवघ्या 15 कि.मी. अंतरावरील उगवा रेल्वेस्थानकाजवळ गाडी आली. पॅसेंजर फलटावर येत असताना इंजिन क्रमांक 6315 तसेच 01778, 91839, 3211 क्रमांकाच्या डब्यांची चाके रुळावरून घसरली. चालकांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. या पॅसेंजर गाडीला एकूण 11 डबे होते. त्यापैकी इंजिनसह पहिले तीन डबे ‘साईड ट्रॅक’वर आले होते, तर मागील आठ डबे ‘मेन लाइन’वर होते. गाडीचा वेग अतिशय कमी असल्याने कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. मीटरगेज रेल्वेमार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच अकोला रेल्वेस्थानकावरील वरिष्ठ अधिकारी उर्वरित.घटनास्थळावर तत्काळ दाखल झाले. या अपघातानंतर खंडव्याकडून अकोल्याकडे येणार्‍या 52993 क्रमांकाच्या अकोला-महू पॅसेंजर गाडीला अकोट रेल्वेस्थानकावरच थांबवण्यात आले. अपघातग्रस्त गाडीच्या आठ डब्यांना दुसरे इंजिन लावून परत अकोल्यात आणण्यात आले. या अपघातामुळे रेल्वेमार्ग क्षतिग्रस्त झाला. अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना एसटी बस व खासगी वाहनांद्वारे अकोला व अकोट येथे पोहोचवण्यात आले.
अकोट रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या अकोला-महू पॅसेंजरद्वारे त्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुपारी 12.40 वाजताच्या सुमारास रवाना करण्यात आले. अकोल्यावरून खासगी वाहनांद्वारे प्रवाशांना अकोटपर्यंत नेण्यात आले. नांदेड विभागाचे डीआरएम पी. सी. शर्मा, डीसीएम चाल्र्स हेरेज आदी वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपघातग्रस्त गाडीचे इंजिन व डबे परत रुळावर आणण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावरून क्रेन आणण्यात आली. याशिवाय ‘प्रेशर’ पंपचाही वापर करण्यात आला.
दुपारी 1 वाजताच्या सुमारास एक डबा रुळावर आणण्यास रेल्वे कर्मचार्‍यांना यश आले. रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुमारे 100 जणांच्या चमूने सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सर्व डबे व इंजिन रुळावर आणले. अपघातामुळे क्षतिग्रस्त झालेल्या मार्गाची दुरुस्तीही करण्यात आली. या अपघातामुळे अकोला रेल्वेस्थानकावरून दुपारी 12 वाजता सुटणारी 52976 क्रमांकाची अकोला-उज्जैन फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली. इतर गाड्या उशिराने धावत होत्या.
उद्यापर्यंत सर्व गाड्या वेळेवर धावतील, असा विश्वास रेल्वे अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अकोट रेल्वेस्थानकावरून दुपारी 12.40 ला खंडव्यासाठी रवाना झाली. प्रवशांना मनस्ताप : रेल्वे अपघातामुळे अकोल्यावरून खंडव्याकडे जाणार्‍या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी अपघात झाल्यानंतर दिवसभर हा मार्ग बंद होता. अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना दुपारी अकोट रेल्वेस्थानकावरून दुसर्‍या गाडीने रवाना केले. मात्र, दुपारची गाडी रद्द झाल्याने त्या गाडीतील प्रवाशांना अकोला रेल्वेस्थानकावर ताटकळत बसावे लागले.