आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपींना फरार घोषित करण्याच्या हालचाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपींचा पोलिस एकीकडे शोध घेत असून, दुसरीकडे फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेला वेग देत आहेत. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयीन दस्तऐवजांची पाहणी केली असून, विधिज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे.

कर्ज फसवणूकप्रकरणी अकोला अर्बन बँकेने प्रथम 4 जुलै रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी व्यापारी नंदलाल उर्फ नंदकिशोर नवलकिशोर कोठारी, जुगलकिशोर नवलकिशोर कोठारी, संतोष नवलकिशोर कोठारी, प्रशांत राठी, रवींद्र श्रीकृष्ण कचोलिया, बँकेचा निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश तुळशीराम राठी, कर्ज व्यवस्थापक के. के. प्रसाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राठी आणि कोठारींनी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, सिटी कोतवाली पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी आरोपींना फरार घोषित करण्यासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाने आरोपींना तात्पुरता दिलासा दिल्याने अर्ज प्रलंबित होता. आता आरोपींना जामीन नाकारल्यानंतर पोलिस एकीकडे आरोपींचा शोध घेत असून, दुसरीकडे फरार घोषित करण्याच्या अर्जाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आरोपींची कोंडी करण्याची तयारी
पोलिस आरोपींच्या संपत्तीची नव्याने माहिती गोळा करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरोपींचा उच्च न्यायालयातूनही जामीन मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने पोलिस त्यांची कोंडी करत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत.