अकोला- पूर्वी अकोला वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नुकतेच विभाजन झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यही निसर्ग सौंदर्यासह सहस्रकुंडसारखा कोसळता धबधबा पाहण्यासाठी उत्तम पर्यटनस्थळ आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचाही समाधानकारक वावर आहे.
राज्य शासनाने १९७१ मध्ये किनवट अभयारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर उमरखेड तहसील (यवतमाळ) किनवट (नांदेड)मधील वनक्षेत्राचा त्यात समावेश करण्यात आला. वन्यजीव अधिनियमान्वये मग १९९६ मध्ये या क्षेत्राचा विस्तार करून पैनगंगा अभयारण्याची निर्मिती केली. या अभयारण्यात उमरखेड तालुक्यातील २९९ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश असून, नव्याने १०० चौरस किलोमीटर क्षेत्र जोडल्याने आता ३९९ चौरस, असे मोठे वनक्षेत्र झाले आहे. खरबी आणि सोनदाभी अशा दोन मुख्य वनपरिक्षेत्रात हे अभयारण्य विस्तारले असून, सहा वर्तुळे ३० नियतक्षेत्रे आहेत. पूर्वी या अभयारण्यात जंगलाची शान असणाऱ्या पट्टेदार वाघाची नोंद होती. मात्र, नंतर तो लुप्त झाला. तरी आजमितीस बिबट, अस्वल, लांडगा, कोल्हा, चौशिंगा, भेडकी, तडस, चिंकारा, चितळ, रानमांजर, ससा, मसन्याऊद, रानडुक्कर, नीलगाय, खवल्या मांजर आदी वन्यप्राण्यांचे दर्शन घडते. अभयारण्यात दोन ते तीन ठिकाणी तलाव असून, या तलावांवर हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडते. तसेच अभयारण्यात विविध पक्षी प्रजातींचा आढळ आहे. साग, मोहडा, बिजा, धावडा, मोईन आदी वृक्ष प्रजातींसह लहान वृक्ष, गवत प्रजाती येथे आढळतात. अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांना अभयारण्याविषयी संपूर्ण मािहती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून खरबी येथे निसर्ग परिचय केंद्राची उभारणी अकोला वन्यजीव विभागाकडून करण्यात आली असून, येथे सचित्र मािहती आहे. त्याच ठिकाणी निसर्ग पाऊलवाट असून, वन भटकंतीचा आनंद पर्यटकांना घेता येतो. पैनगंगा नदीने या अभयारण्यास तीन बाजूंनी वेढले असून, तिचा विस्तीर्ण जलाशय अभयारण्यासाठी जीवनदायी ठरला आहे. या अभयारण्याच्या टोकावर असलेला सहस्रकुंड धबधबा पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणारे स्थळ आहे. नायगरा फॉल्ससारखा इंग्रजी सी आकारात कोसळणारा हा छोटेखानी धबधबा पाहण्यासाठी गर्दी होते.