आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मतदारराजा झाला सुज्ञ; राजकीय भुलथापांना झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राजकीय नेत्यांच्या भुलथापांना आता मतदारराजा बळी पडत नाही. कुणाला विजयी करायचे आणि कुणाचा पराभव करायचा, याचा निर्णय मतदार अगदी सहजपणे घेताना दिसतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी आला. पंचायत समितीच्या गणात विजयी झालेल्या उमेदवाराचा पक्ष आणि जिल्हा परिषद गटात विजयी झालेल्या उमेदवाराचा पक्ष अनेक ठिकाणी बदललेला दिसतो. मतदारराजा सुज्ञ असून, तो राजकीय नेत्यांच्या भुलथापांना बळी पडत नाही. त्याला ज्या उमेदवाराला विजयी करायचे त्यालाच मतदान करत सुटकेचा नि:श्वास सोडतात.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या दोन गण या तीनपैकी दोन ठिकाणी एकच पक्षाचे आणि एका ठिकाणी अपक्ष किंवा दुसर्‍या पक्षाचा उमेदवार असे एकूण जिल्हा परिषदेचे 28 गट आहेत. त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणी मतदारांनी कुठल्याही राजकीय पक्षाला झुकते माप दिले नाही. गणातील भिन्न उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराची निवड या ठिकाणी मतदारांनी केल्याचे चित्र आहे. राजकीय पक्षांनादेखील भविष्यात उमेदवार देताना ते लोकप्रिय आहेत की नाही, याची खातरजमा करावी लागेल. त्यामुळे आपसूकच चांगले लोकप्रतिनिधी मतदारांना मिळतील.
जिल्हा परिषदेच्या पाच गटात आणि संबंधित पंचायत समितीच्या गणात सर्वच ठिकाणी उमेदवारांची निवड करताना मतदारांनी कुठल्याही एकाच राजकीय पक्षाला झुकते माप दिले नाही. जिल्हा परिषदेच्या गटात वेगळा आणि पंचायत समितीच्या पहिल्या व दुसर्‍या गणात वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे निवडून दिले आहे. या सर्व प्रकारामुळे मतदारराजा एकाच राजकीय पक्षासोबत बांधील नसल्याचे स्पष्ट झाले असून, ही आकडेवारी मतदार सुज्ञ असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करते.
आरक्षणाबाबत चर्चा
अकोला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच लागलेल्या निकालानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी निघण्याची शक्यता जिल्ह्यातील राजकीय वतरुळामध्ये वर्तवण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यास अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची संख्या राहणार आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी आरक्षण काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये एकाच पक्षाला पसंती
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, पाथर्डी, अकोट येथील आसेगाव बाजार, कुटासा, बाळापूर तालुक्यातील व्याळा, देगाव, बार्शिटाकळी येथील महान, राजंदा, पातूर तालुक्यातील सस्ती व मळसूर येथील जिल्हा परिषदेच्या या दहा गटात आणि पंचायत समितीच्या संबंधिंत दोन गणात भारिप- बमसंचे उमेदवार विजयी झाले. अकोट तालुक्यातील उमरा, अकोला तालुक्यातील खडकी बुद्रूक, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, बार्शिटाकळीच्या जांब वसू येथील गटात आणि गणात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. अकोला तालुक्यातील उमरी प्रगणेसह बाळापूर येथे शिवसेनेचा विजय तिन्ही ठिकाणी झाल्याचे दिसते. अकोला तालुक्यातील चिखलगाव, पातूर तालुक्यातील शिर्ला या तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर युतीचे उमेदवार हे चार ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गटात व पंचायत समितीच्या गणात विजयी झाले. यामध्ये अकोला तालुक्यातील दहिहांडा, उगवा आणि घुसर तसेच बार्शिटाकळी येथील पिंजरचा समावेश आहे. असे एकूण 21 जिल्हा परिषद गटात विजयी उमेदवारांचा पक्ष हाच पंचायत समितीच्या गणात विजयी झाल्याचे चित्र आहे.