आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकली जिल्हा परिषद आवारात, खुर्च्या मात्र रिकाम्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. तांत्रिकदृष्ट्या जिल्हा परिषदेत सत्ता अद्यापही स्थापन झालेली नाही. नेमक्या या संक्रमणकाळाची संधी साधून अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून गायब असल्याचे आढळले. ‘दिव्य मराठी’च्या चमूने 5 डिसेंबरला दुपारी 4 वाजता पाहणी केली असता, अनेक विभागप्रमुख, कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना मान मोडून काम करावे लागते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबरपासून लागू झालेली आचारसंहिता अद्यापही कायम असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांवर अंकुशच नसल्याचे स्पष्ट झाले. आज एका पाहणीमध्ये जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसह 90 टक्के कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. कर्मचार्‍यांच्या मोटारसायकली मात्र परिसरात होत्या. परंतु, कर्मचारी हजेरी लावून बाहेर गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. समाजकल्याण विभागामध्ये बी. बी. खंडारे हा एकच कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसले. विभागप्रमुख मात्र बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. लघुसिंचन, पशुसंवर्धन, कृषी, सामान्य प्रशासन विभागासह इतर विभागांमध्ये शुकशुकाट होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार मात्र दालनामध्ये उपस्थित होते.
कृषी अधिकारी दौर्‍यावर
कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची पाहणी केली असता, येथे विभागप्रमुख डॉ. उदय काथोडे अनुपस्थित होते. त्यांच्या कार्यालयातील परिचर सुमित्रा बिरड यांनी साहेब मीटिंगला गेल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या दालनातील बोर्डवर आजच्या बैठकीचा उल्लेखच नव्हता. त्यांच्या कार्यालयातील सहायक प्रशासकाला अनुपस्थित कर्मचार्‍यांबाबत चौकशी केली असता, त्यांनी कोण कुठे गेले याची माहिती नसल्याचे सांगितले.
‘समाजकल्याण’मध्ये एकच कर्मचारी
समाजकल्याण विभागात एक वरिष्ठ लिपिक उपस्थित दिसले. या विभागातील अन्य कर्मचारी कुठे गेले, अशी विचारणा केली असता, बाहेर चहा पिण्यासाठी गेल्याचे उत्तर मिळाले.
सीईओ ‘आउट ऑफ कव्हरेज’
मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळेंबाबत चौकशी केली असता, ते अध्र्या तासात येणार असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकांनी सांगितले. उन्हाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राबाहेर होता.
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकार्‍यांचे दालन रिक्त होते.
अधिकारी, कर्मचार्‍यांची दांडी
जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या दालनाला अशा प्रकारे कुलूप लागलेले होते.
जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांमध्ये शुकशुकाट, सत्ताधारी नसल्याची संधी साधून अनेकांची अनुपस्थिती