आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.चे अध्यक्षपद ‘एससी’ प्रवर्गासाठी 30 डिसेंबरला होणार निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील उमेदवाराला मिळणार आहे. 5 डिसेंबर रोजी मुंबईत ग्रामविकास मंत्रालयाने आरक्षण सोडत जाहीर केली. भारिपकडे या पदासाठी पाच दावेदार असून, पक्षाची सत्ता आल्यास अँड. प्रकाश आंबेडकर कुणाला खुर्चीवर बसवतात याची उत्कंठा उमेदवारांसह सर्वांनाच लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाने सर्वाधिक 23 जागा मिळवल्या. भाजपला 11, तर शिवसेनेला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. चार अपक्षांनीही बाजी मारली आहे. निकालात कोणत्याही पक्षाकडे सत्तेसाठी झुकते माप नाही. त्यामुळे भारिप-बहुजन महासंघाला सत्तेसाठी काँग्रेस किंवा अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 5 डिसेंबरला दुपारी ग्रामविकास मंत्रालयाद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निघाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड 30 डिसेंबर रोजी होणार आहे. भारिप-बहुजन महासंघाकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील पाच उमेदवार आहेत. त्यामधील मलकापूर गटातील दामोदर जगताप हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होण्याची दाट शक्यता आहे. अँड. प्रकाश आंबेडकर नव्या चेहर्‍याला संधी देतात की अनुभवी उमेदवाराला खुर्चीत बसवतात हे सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या पदावर कोणता उमेदवार आरूढ होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.