आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola ZP And Panchayat Comity Election Result Today

आज मतमोजणी; ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलिस तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर खदान परिसरातील शासकीय गोदाम परिसरात रविवारी दुपारपासून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकोला तालुक्यात झालेल्या निवडणुकीनंतर शासकीय गोदामात ईव्हीएम जमा करण्यात आल्या. ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम तयार केली आहे. या रूमच्या सुरक्षेसाठी पाच सशस्त्र पोलिसांना तैनात करण्यात आले आहे तसेच निवडणूक विभागाच्या इतर साहित्याच्या सुरक्षेसाठीही पाच सशस्त्र पोलिसांची व्यवस्था करण्यात आली. ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अकोला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली.
अशी होईल मतमोजणी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. सकाळी 10. वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक विभागातर्फे अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी प्रात्यक्षिकाचेही आयोजन केले होते. शासकीय गोदाम परिसरात होणार्‍या मतमोजणीसाठी संगणक आणण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी अद्ययावत सॉफ्टवेअर मागवले असून, एकाच वेळी गण आणि गटातील मोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल प्रक्रिया लवकर आणि अचूक होणार असून यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वाहतूक मार्गात बदल
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सिंधी कॅम्प चौकी ते हिंगणा फाटा या दरम्यानच्या वाहतुकीचा मार्ग बदलण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक कौलखेड चौक, संत तुकाराम चौक, गोरक्षण रोड, हुतात्मा चौक या मार्गाने वळवण्यात येणार आहे.

राजकीय भवितव्याला पोलिसांचा खडा पहारा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या 2 डिसेंबरला होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अकोला तालुक्यातील गण आणि गटातील मतमोजणी खदान परिसरातील शासकीय गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी गोदाम परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत तसेच संगणकासह इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.