आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेवर ‘भारिप-बमसं’च्या वर्चस्वाची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिवसेना व काँग्रेस ठोस भूमिका घेण्याची शक्यता नसल्यामुळे भारिप-बमसंचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. अपक्ष व काँग्रेसच्या पाठिंब्याने भारिप-बमसं पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे संकेत रविवारी रात्री उशिरा मिळाले. दरम्यान, भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुती करून सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे धूसर झाल्याची चिन्हे आहेत. भारिप-बमसंकडून अध्यक्षपदासाठी शरद गवई यांचे नाव आघाडीवर असून, सरलाबाई मेर्शाम, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, रवींद्र गोपकर यांची नावे चर्चेत आहेत.

जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी भारिप-बहुजन महासंघाकडे स्वत:चे 22, काँग्रेसचे 5, राष्ट्रवादीचे 2 आणि अपक्ष 4 असे एकूण 33 सदस्य संख्येचे बलाबल होणार असल्याने जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंचे वर्चस्व निर्माण होणार आहे, अशी शक्यता आहे. भारिप-बमसंला सत्तेत येऊ द्यायचे नाही म्हणून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी प्रयत्न केले. जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप-बमसंचे 22 आणि 3 अपक्ष सदस्य असे 25 बलाबल असतानाही महायुतीचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुती तयार करून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रतिभा अवचार आणि उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राधिका पाटील यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तीन दिवसांपूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत न जाण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मात्र वरिष्ठांच्या आदेशावरून मतभेद आहेत.

शिवसेनेमधील एक गट सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीत सहभागी होण्यास इच्छुक आहे, तर दुसरा गट वरिष्ठांचे आदेश पाळण्यावर ठाम आहे. विरोधात बसण्याची तयारी करून उपाध्यक्षपदाचा अर्ज भरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे भाजपसोबत शिवसेना असे गणित चुकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महायुती जुळून आल्यास अध्यक्षपदाचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा अवचार भरणार असल्याचे निश्चित आहे. उपाध्यक्षपदावरून काँग्रेसची द्विधा मन:स्थिती आहे. काँग्रेसच्या निरीक्षकांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह असून, उपाध्यक्षपदाच्या दावेदारीवरून पक्षात घमासान सुरू होते. भाजप महायुतीचे समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार संजय धोत्रे यांनी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत
निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पक्षासोबत राहणार आहे. त्यामुळे आम्ही समविचारी एका ठिकाणी असणार आहोत, तर जातीयवादी पक्षासोबत जाणे पक्षविरोधात असणार आहे. ’’ बाबाराव विखे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

काँग्रेससोबतच राहणार
जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी आमचे दोन सदस्य काँग्रेससोबतच राहणार आहेत. काँग्रेसचे पाच आणि आमचे दोन असे सात सदस्य एकत्र आहेत.’’ श्रीकांत पिसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अकोला.

सत्तास्थापनेसाठी प्रयत्न
सत्तास्थापनेसाठी आमचे प्रय} सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत येईल, अशी अपेक्षा आहे. आमचे 23 आणि दोन अपक्ष असे 25 सदस्य संख्येचे बलाबल सध्या हाती आहे. ’’ बळीराम सिरस्कार, जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.

भारिप-बमसंच्या विरोधात
भारिप-बमसंच्या विरोधात राहणार आहोत. यामध्ये शिवसेना व 2 अपक्ष आमच्यासोबत राहतील. भारिप-बमसंच्या विरोधात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार्‍यांना भाजपचे सदस्य सर्मथन देणार आहे.’’ तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप

सत्ता स्थापन करू
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला 27 चे संख्याबळ आवश्यक आहे. ते गाठून भारिप-बमसं सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमच्यासोबत येणार्‍यांचे स्वागतच आहे. संख्याबळासाठी बोलणी सुरू आहे.’’ - अँड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप-बमसं

विरोधी बाकावर बसणे निश्चित
सत्तेसाठी शिवसेना कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. तसे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वीच दिले आहेत. विरोधी बाकावर बसणे निश्चित आहे. औपचारिकता म्हणून उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करू.’’ - आमदार दिवाकर रावते, शिवसेना नेते

अध्यक्षपदाचे दावेदार
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव आहे. भारिप-बमसंकडे या पदासाठी चार दावेदार असून, भारिप-बमसंची सत्ता प्रस्थापित झाल्यास अँड. प्रकाश आंबेडकर कुणाला संधी देतात, याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. यापैकी शरद गवई, सरलाबाई मेर्शाम, दामोदर जगताप आणि रवींद्र गोपकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.