आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्हा परिषद : अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज होणार निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी 30 डिसेंबरला दुपारी तीन वाजता होणार्‍या विशेष सभेत करण्यात येणार आहे. त्रिशंकू निकाल आल्यानंतर गेल्या 27 दिवसांपासून सत्तेची समीकरणे रचण्यात येत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला भारिप-बहुजन महासंघ अपक्ष व इतरांच्या सहकार्याने सत्ता स्थापन करणार आहे, असे जवळपास निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजेपासून दाखल करता येणार आहे. दुपारी 1 वाजता अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दुपारी 3 वाजता विशेष सभा होणार आहे. या सभेत पीठासीन अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोहम वायाळ काम पाहतील. भारिप-बहुजन महासंघातर्फे अध्यक्षपदासाठी दामोदर जगताप, शरद गवई, रवींद्र गोपकर यांची नावे चर्चेत आहेत. महाआघाडीकडूनही अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस व शिवसेनेच्या भूमिकेवर महाआघाडीचे भवितव्य ठरणार आहे. सत्तास्थापनेची फिल्डिंग लावण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू होत्या.

जिल्हा परिषद निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. भारिप-बहुजन महासंघाने 22 जागांवर विजय मिळवला असून, सर्वात मोठा पक्ष म्हणून तो समोर आला आहे. या निवडणुकीत भारिप-बमसं व भाजपला फायदा झाला असला तरी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवारांच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्यासाठी भारिप-बमसंने कंबर कसली आहे. काँग्रेसदेखील भारिप-बमसंसोबत जाण्याचे संकेत आहेत.