आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांची ‘तोबा’गर्दी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रशासनासह उमेदवारांचीही उडाली तारांबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयावर शनिवारी एकच गर्दी केली होती. निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार शेवटचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयावर सकाळी 10 वाजतापासून हजर झाले होते. 11 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, पहिल्या चार दिवसांत कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पण, तरीसुद्धा एखाद्यावेळी पक्षाने हिरवी झेंडी दिली, तर असे लक्षात घेऊन अनेक उमेदवारांनी फक्त अर्ज घेऊन ठेवले होते. परंतु, ते सादर केले नव्हते. शुक्रवारी रात्री भारिप-बमसं व शिवसेनेची यादी जाहीर झाली. त्यामुळे शनिवारी या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अधिकृत यादी घोषित झाल्यानंतरही अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळण्याची आशा असल्याने त्यांनीसुद्धा अधिकृत उमेदवारासोबत आपल्या पक्षाकडून अर्ज सादर केले. या पक्षांचे उमेदवार ‘एबी फॉर्म’द्वारे नंतर निश्चित होणार आहेत. एकंदरीत अधिकृत उमेदवारांसह पक्षाकडून निर्णय बदलला जाण्याची शक्यता असल्याने उमेदवारी मिळण्याची आशा असलेल्यांनीही शनिवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे जिल्हय़ातील सर्वच तहसीलवर गर्दी झालेली दिसून आली.
अर्ज स्वीकृतीसाठी स्वतंत्र केंद्र : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अर्ज स्वीकृतीसाठी गर्दी होईल. त्यामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनातर्फे अकोला तहसील कार्यालयात स्वतंत्र पाच केंद्र लावले होते. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सोहम वायाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे, सुनील पाटील, पूजा माटोडे, मनोज बोंडे, डी. एस. बचुटे आदींनी चोख कामगिरी केली.
भाजप, राष्ट्रवादीची उशिरा यादी जाहीर : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांच्या अधिकृत याद्या शेवटच्या दिवशी दुपार 4 वाजेपर्यंत जाहीर झाल्या नव्हत्या. सायंकाळी 4.30 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेस, तर संध्याकाळी 6 वाजता भाजपने यादी जाहीर केली.