आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सदस्यांच्या प्रश्नांना अधिकार्‍यांचे गोड उत्तर, शेवटची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच शांततेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा बुधवारी पहिल्यांदाच शांततेत पार पडली. सदस्यांद्वारे मांडण्यात आलेले ज्वलंत प्रश्न डरकाळी फोडणारे ठरले तरी, अधिकार्‍यांनी दिलेल्या वेळकाढू उत्तरांमुळे सभेचा शेवट गोडव्याने झाला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी दीड वाजता सुरू झालेल्या सभेची सांगता सायंकाळी 5 वाजता झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा पुष्पाताई इंगळे होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती पंढरीनाथ हाडोळे, शिक्षण व अर्थ समिती सभापती जयाताई गावंडे, समाजकल्याण समिती सभापती उषाताई मुरळ, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, नितीन देशमुख, ज्योत्स्नाताई चवरे, हरिभाऊ भालतिडक आदींची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी सभेची विषयसूची मांडली.

यात महिला बालकल्याण समितीच्या अखर्चित निधीचा विनिमय, ताजनापूर प्रस्थापित साठवण तलावाचे बुडीत क्षेत्रात जाणार्‍या जमिनीच्या सरळ खरेदीकरिता मान्यता, अकोट 84 खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेस मान्यता, सेस फंडातून रस्ते बांधकाम आदी विषयांवर सभागृहात चर्चा झाली.

विद्यार्थिनींना मिळणार सायकली

महिला व बाल कल्याण विभागांतर्गत पहिली ते बारावीत शिक्षण घेणार्‍या गरजू विद्यार्थिनींना सायकली मिळणार आहेत. नऊ लाखांच्या अखर्चित निधीतून हा खर्च करण्यात येईल.

भक्तिनिवास बांधण्याचा आग्रह

ग्रामीण भागातील मंदिराच्या ठिकाणी भक्तिनिवास असावेत, असा आग्रह धरत जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

देऊळगावमधील पाणीप्रश्न पेटला
सहा वर्षांपूर्वी पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत टाकी बांधण्यात आली. सहा महिनेही नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे अध्यक्षांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांसह गावाला भेट द्यावी, असा मुद्दा उपस्थित करत यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी केला.

सरकटेंच्या अनुपस्थितीने संताप
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाबाबत विविध विषय समोर आले. मात्र, कार्यकारी अभियंता सरकटे यांची अनुपस्थिती असल्याने अनेक सदस्य संतप्त झाले.

पाण्याची टाकी, मात्र थेंबही नाही
खडकीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र, प्रत्यक्षात नळांना थेंबही येत नाही. विद्यमान अध्यक्षा पुष्पाताई इंगळे या सदस्या असतानापासून हा प्रश्न रेंगाळत पडल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुरेश फाळके यांनी केला.

दृष्टिक्षेप मंजूर झालेल्या ठरावावर

प्रत्येक गावात भक्तिनिवासाचे बांधकाम महिला बालकल्याणचा नऊ लाखांचा अखर्चित निधी
ताजनापूर तलाव बुडीत क्षेत्र जमिनीच्या खरेदीस मान्यता
84 खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला मान्यता
सेस फंडातून रस्त्यांची दुरुस्ती

शेवटच्या सभेने ‘रामराम’

ही जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा होती. या सभेत सदस्यांनी केलेल्या मुद्दय़ांवर मंजुरी मिळाली. मात्र, शेवटची सभा असल्याने अधिकार्‍यांशी गोडवा कायम ठेवत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सभागृहाला रामराम ठोकला.