आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषदेतील अनेक नेते झाले ‘बे’सर्कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला जिल्हा परिषदेच्या आरक्षणातील बदलाने अनेक नेते ‘बे’सर्कल झाले आहेत. यात डॉ. अशोक गाडगे आणि अशोक शिरसाट (दोघे ही भारिप बमसं), सुनील धाबेकर (काँग्रेस), चंद्रशेखर पांडे गुरुजी, नितीन देशमुख व गजानन पुंडकर (दोघेही अपक्ष) आदींचा समावेश असून त्यांना नवीन सर्कल शोधावे लागणार आहे.

डिसेंबरमध्ये होणार्‍या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी, 1 ऑगस्टला काढण्यात आली. या वेळी महिलांचे 50 टक्के आरक्षण घोषित झाले. यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सहा, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सात, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 12, असे आरक्षण आज जाहीर झाले. या आरक्षणाचा 23 पुरुष पुढार्‍यांना फटका बसला आहे. महिला व विद्यमान सर्कलमधील सामाजिक आरक्षणातील बदलाचा सत्तारूढ भारिप बमसंला सर्वाधिक फटका बसला. त्यात भारिप बमसंचे 11, शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचा एक व तीन अपक्षांचा समावेश आहे.

भारिप बमसंचे काशीराम साबळे, अब्दुल रशिद, अनिल गणगणे, डॉ. अशोक गाडगे, दामोदर जगताप, प्रा. सुरेश पाटकर, सुभाष राठोड (शिवसेनेत गेले),अशोक शिरसाट यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. आरक्षणातील बदलामुळे सुभाष रौंदळे, प्रदीप देशमुख, सुरेश फाळके यांना आता त्यांच्या सर्कलमधून लढता येणार नाही. शिवसेनेचे ज्ञानेश्वर मानकर, वासुदेव डाबेराव, चंद्रशेखर पांडे गुरुजी, हरिभाऊ भालतिलक उर्फ जागो पहेलवान, बंडू ढोरे, विठ्ठलराव गावंडे, माणिकराव तायडे यांनाही महिला आरक्षणाचा फटका बसला. महिला आरक्षणामुळे काँग्रेसचे सुनील धाबेकर, आलमगीर खान, रमेश म्हैसने, बबनराव डाबेराव यांना आता सर्कल राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश खलोकार यांचा सर्कलही महिलांसाठी आरक्षित झाला आहे. अपक्ष गजानन पुंडकर, नितीनकुमार टाले उर्फ नितीन बाप्पू देशमुख, प्रशांत अढाऊ या नेत्यांना महिला आरक्षणाचा फटका बसला आहे.

काही थोडक्यात बचावले आणि काही तर विस्थापितच!
विद्यमान विरोधी पक्षनेता व शिवसेनेचे लोहारा सर्कलचे सदस्य सेवकराम उर्फ मामा ताथोड यांचा जुना सर्कल आता राहिलेला नाही. हा सर्कल पुनर्रचनेमध्ये हातरुणमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सुदैवाने नवीन सर्कलही सामान्यच राहिल्याने त्यांना नव्या सर्कलचा शोध घेण्याची गरज नाही. रौंदळा सर्कलचे नामकरण आता मुंडगाव, तर खरप सर्कलचे घुसर झाले आहे. या सर्कलचे प्रतिनिधित्व करणारे प्रा. सुरेश पाटकर व प्रशांत अढाऊ या नेत्यांना महिला आरक्षणामुळे पर्यायी सर्कलचा शोध घ्यावा लागणार आहे.