आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 30 डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य भारिप-बमसंचे निवडून आले आहेत. सोमवारी वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमतासाठी दोन जागा कमी पडत आहेत. त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेमध्ये आघाडीला भारिप-बमसंचा पाठिंबा, तर त्या मोबदल्यात अकोला जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला काँग्रेसचा पाठिंबा देण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे वाशिम द्या अन् अकोला घ्या अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी भारिप-बमसंला 27 सदस्यांची गरज आहे. त्यांचे 23 सदस्य निवडून आले आहेत. दोन अपक्ष हे भारिप-बमसंचे असल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यामुळे भारिप-बमसंला जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी भारिप-बमसंला काँग्रेस पाठिंबा देऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे भारिप-बमसं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवेल, असे जाणकारांचे मत आहे. 23 डिसेंबरला वाशिम जिल्हा परिषदेचे निकाल घोषित झाले. तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी दोन सदस्यांची गरज आहे. वाशिममध्ये भारिप-बमसंचे तीन सदस्य निवडून आले आहेत.
त्यामुळे वाशिममध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही अकोल्यात तुम्हाला सहकार्य करतो, अशी चर्चा काँग्रेसच्या आणि भारिप-बमसंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी भारिप-बमसंसोबत जाण्यास हिरवी झेंडी दिली असताना, जिल्ह्यातील काँग्रेस नेते मात्र अडून बसल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून होत असल्याची माहिती आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.