आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदाराच्या गावात ‘भारिप’चा लाल दिवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्याची खासदार संजय धोत्रे यांची इच्छा पूर्ण झाली नाही, अशी चर्चा राजकीय वतरुळात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले शरद गवई यांना अध्यक्षपदासाठीची लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. त्यामुळे ही लाल दिव्याची गाडी आता पळसो बढे गावात दिसणार आहे.

पळसो बढेत जल्लोष :
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद गवई यांनी अशोक वाटिकेत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लाल दिव्याच्या गाडीत बसून पळसो बढे येथे पोहोचले. त्यांच्यासोबत जवळपास 20 वाहनांचा ताफा आणि 200 कार्यकर्ते होते. गावात पोहोचल्यावर सरपंच लीलाबाई काळे, उपसरपंच प्रवीण गेबड यांनी शरद गवई यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले शरद गवई यांच्या माध्यमातून खासदार संजय धोत्रे यांच्या पळसो बढे या गावात भारिप-बमसंला मिळालेला ‘लाल दिवा’ झळकणार आहे.

सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुरणखेड गटाचे सदस्य शरद गवई यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जुळवलेल्या जातीय समिकरणामुळे भारिप-बमसंला पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे
पक्ष निरीक्षक अशोक पारखी यांच्या निर्णयाने या दोन्ही पक्षानी आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारिप-बमसंला साथ दिली. त्यामुळे हे शक्य झाले. पळसो बढे येथील रहिवासी खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापनेचा विचार केला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन अपक्षांच्या मदतीने महायुती स्थापन करण्याचा त्यांचा मनसुबा होता. तसे त्यांनी 24 डिसेंबरला जाहीर केले होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप पदाधिकार्‍यांच्या महायुतीसंदर्भात वाटाघाटीही सुरू होत्या. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सावध पावित्रा घेत भारिप-बमसंला पाठींबा देण्याचे आदेश सदस्यांना दिले.

त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे यांनी भारिप-बमसंला पाठींबा देत असल्याचे सोमवारी दुपारी जाहीर केले. त्यामुळे भाजपचे गणित चुकले. खासदार संजय धोत्रे यांच्या महायुतीत भाजपचे 11, शिवसेनेचे 8 आणि 2 अपक्ष असे एकूण 21 सदस्यच उरले.


सामाजिक कार्याचा वारसा
शरद गवई मूळचे पळसो बढे येथील रहिवासी असून, शेतकरी कुटुंबातील आहे. शरद गवई कला शाखेचे पदवीधर असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण पळसो बढेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले.त्यांचा मुलगा विक्की मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तर मुलगी प्रणाली पळसो बढे येथील रार्जशी शाहू महाराज महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता अकरावीत शिकत आहे. आजोबाकडून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. त्यातून ते राजकारणात शिरले अन् जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोचले.

ग्रामीण भागात मूलभूत गरजा पुरवणार
सुरुवातीपासूनच मला गरिबीची जाण आहे. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास निश्चित सार्थकी लावेल. ग्रामीण भागात मुलभूत गरजा पुरवण्यासोबतच बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी माझे घराचे व कार्यालयाचे दार नेहमी खुले राहील.शरद गवई, अध्यक्ष, जिल्हा परिषद