आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण समाजातील युवकांनी उद्योग, व्यवसायात यशस्वी व्हावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ब्राह्मण समाजातील युवकांनी नोकरी एके नोकरी करता यशस्वी व्यवसायी, उद्योजक होण्याचा ध्यास बाळगावा. इतर समाजाने व्यापारामध्ये कशा प्रकारे प्रगती केली त्यातून बोध घेऊन आपणही तो कित्ता गिरवावा, असे आवाहन नागपूरच्या विश्वेश्वरैया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अकोलातर्फे व्यवसाय नोकरी मार्गदर्शन शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डाॅ. मिलिंद चौधरी यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या के. आर. ठाकरे सभागृहात झालेल्या शिबिराच्या आरंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन, भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. दीपक केळकर, माधव जपे, ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष गोविंद कुळकर्णी, महाराष्ट्र चंेेबरचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर, महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष उदय महा उपस्थित होते. प्रास्ताविकात उदय महा यांनी आयोजनाची माहिती दिली. ब्राह्मण समाजाचे संघटन करण्याचा उद्देश तर शिबिरामागे आहे त्याचप्रमाणे समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, व्यापार-उदिमाप्रति त्यांच्यामध्ये प्रेरणा जागावी हाही प्रयत्न आहे. येत्या काळात अकोल्याला विदर्भातील महिलांचे संमेलन घेणार आहोत. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ध्येय उच्च असावे कारण त्याशिवाय हवी तशी प्रगती करता येत नाही ही जाणीव डॉ. मिलिंद चौधरी यांनी करून दिली. उद््घाटन सत्राचे संचालन महेश मोडक यांनी तर संजय देशमुख यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्राची सुरुवात, डॉ. दीपक केळकर यांच्या मार्गदर्शनाने झाली. प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचे असते, परंतु होता येत नाही त्यामागची कारणे त्यांनी सांगितली. काही नवीन करायला गेलो तर अटी घातल्या जातात. चौकटीत बंदिस्त होऊन राहिलो तर यशस्वी होण्याचा मार्गच खुंटतो. खरेतर ९५ टक्के लोक क्षमतांचा वापरच करत नाहीत. असे तत्त्वज्ञांचे मत आहे. इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली तर यश दूर नाही. मोठे होण्यासाठी टोले घ्यावेच लागतात. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय समन्वयक माधव जपे यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. एमआयडीसी, एमएआयडीसीमार्फत असणाऱ्या अर्थसाहाय्य योजनांचा लाभ घ्यावा. शिक्षण पद्धती सुदृढ होत असली तरी अद्याप अभ्यासक्रमात स्वयंरोजगाराविषयी काहीही नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या तरी कार्यकुशलता महत्त्वाची आहे. यशस्वी पुरुष आपले कर्तृत्व सिद्ध करताना नवा सिद्धांत मांडत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. या वेळी प्रा. नरेंद्र देशपांडे, श्रीकर सोमण यांनी महाराष्ट्रीय ब्राह्मण व्यापारी संस्था एक वाटचाल या विषयावर भाष्य केले. १९८८ साली संस्थेची स्थापना झाली. सध्या १७५ सदस्य आहेत. अकोल्यातून प्रेरणा घेऊन जळगाव, नाशिक येथेही संस्था सुरू झाल्या, यवतमाळला सुरू होण्याच्या बेतात आहे. व्यासपीठावर डॉ. माधव देशमुख, अकोला व्यापारी संघाचे अध्यक्ष मंगेश देशमुख, प्रवीण कुळकर्णी नाशिक विराजमान होते. मनीषा कुळकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र टाकळकर यांनी शिबिराचा समारोप केला. सुत्रसंचालन विजय मोहरीर यांनी केले.
मुख्यमंत्र्यांवर टीका
ब्राह्मणसमाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष गोविंद कुळकर्णी यांनी शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अन्य समाजाच्या कार्यक्रमांना जाणारे मुख्यमंत्री आज अनुपस्थित राहिले हे योग्य नाही असे ते म्हणाले. आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, कार्यक्रम तर होणारच जे येतील त्यांच्यासोबत आणि येणा-यांशिवायही.
‘आक्रेसिया’ आजार यशातील अडसर
‘आक्रेसिया’आजार आपण जे ठरवतो त्याविरुद्ध कृती करायला लावतो. त्यामुळे त्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. उद्यापासून पहाटे फिरायला जावे, असा निश्चय आपण करतो, परंतु आक्रेसिया मनातील विचार आक्रसण्याचे काम करतो. तसे पाहता ४२ दिवस एखादी कृती सतत केल्यास सवय जडते. तसाही प्रयत्न करावा, असे डॉ. दीपक केळकर यांनी सांगितले.