आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाचा भाजपशी अकोल्यात छुपा समझोता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-‘कॉंग्रेसकडे आपण अकोल्याची एकच जागा मागितली होती, मात्र भाजपशी त्यांनी छुपा समझोता केला, त्यामुळेच महाराष्ट्र लोकशाही आघाडीबाबत ते अफवा पसरवत आहे,’ असा आरोप भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे शुक्रवारी 14 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
अँड. आंबेडकर म्हणाले, की दक्षिण मुंबई, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद या मुस्लीम बहुल भागात काँग्रेसने उमेदवार दिला नाही. पण, अकोल्यात भाजपसोबत अप्रत्यक्ष समझोता करत काँग्रेसने मुस्लीम उमेदवाराला उभे केले आहे. काँग्रेस व भारिप-बमसं यांच्यातील आघाडी ही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मान्यतेने करावी, अशी मागणी आपण केली होती. मात्र राष्ट्रीय अध्यक्षांनी आघाडी फेटाळल्याचे काँग्रेसने पत्राद्वारे कळवले होते. महाराष्ट्र लोकशाही आघाडी खूप जागांची मागणी करत आहे, असा काँग्रेसने केलेला दावा फसवा आहे, असा आरोप त्यांनी केला.
ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नरेंद्र मोदींसोबत आघाडी करणार आहे. अगदी तशाच प्रकारे मुस्लीम मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार उभे न करता अकोल्यात भाजपला मदत व्हावी, यासाठी मुस्लीम समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिली आहे,असा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या या खेळीची पूर्वसूचना मुस्लीम समाजाला आहे, असे ते म्हणाले.
देशात काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्षांना धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची ही खेळी त्यांच्या अंगाशी येण्याची चिन्हे आहेत,असे अँड. आंबेडकर म्हणाले. देशातील मुस्लिम समाजाने नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. आजपर्यंत मुस्लीम समाज काँग्रेसबरोबर राहिला आहे. निवडणुकीत मुस्लीम समाज काँग्रेसचा मोठय़ा प्रमाणात मतदार राहिला आहे. तेव्हा धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र घेत नरेंद्र मोदींना थांबवण्याचे धोरण काँग्रेस पक्षाने राबवले नाही. काँग्रेसने मुस्लीम, दलित समाजाला दूर सारला,असा आरोप त्यांनी या वेळी केला. मुस्लिम समाजाला थांबवायचे आणि बहुजन समाजातील नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. या वेळी पत्रकार परिषदेला आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, गौतम गवई, गजानन गवई आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.