आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी संस्थेकडून रुग्णवाहिकेचा गैरवापर; आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - खासदार निधीतून येथील ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा मेडिकल असोसिएशन या खासगी संस्थेने गैरवापर केला आहे. तसेच रुग्णांकडून भाडे आकारल्याची तक्रार नगरसेविकेने उपसंचालक आरोग्य विभाग परिमंडळ अकोला यांच्याकडे केली आहे.

वणी ग्रामीण रुग्णालयात परिसरातून येणार्या रुग्णांच्या सुविधेसाठी खासदार हंसराज अहिर यांनी खासदार निधीमधून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. एमएच 29 एम 9607 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या नावाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीही करण्यात आली होती. परंतु वणी येथील मेडिकल असोसिएशन या संस्थेने स्वत:चे मालकीची रुग्णवाहिका समजून शहरातील आंबेडकर चौकातील एका मेडिकलसमोर उभी करणे सुरू केले़ तसेच या रुग्णवाहिकेचा त्यांनी खासगी वापर करणे सुरू केले. त्यासाठी वणी-चंद्रपूर 1200 रुपये, वणी -नागपूर 2400 रुपये व वणी-यवतमाळ 2200 रुपये असे भाडे आकारून रुग्णवाहिकेला व्यावसाईक रुप देण्यात आले़ खासदारांनी निधीतून गोरगरिबांसाठी ही रुग्णवाहिका दिली. परंतु या रुग्णवाहिकेचा मेडिकल असोसिएशन या खासगी संस्थेने गैरवापर करून स्वत:चा स्वार्थ साधला आहे़ परिणामी गरीब नागरिकांना शासकीय रुग्णवाहिकेचा लाभ न मिळता पैसे देऊन खासगी रुग्णवाहिकेने रुग्णांना न्यावे लागत आहे़ याबाबत रुग्णालय प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे़ आतापर्यंत रुग्णालय प्रशासनाला रुग्णवाहिका आहे, की नाही याचीसुद्धा माहिती नाही़ या रुग्णवाहिकेच्या भरोशावर मेडिकल असोसिएशन या खासगी संस्थेने रुग्णांना भाडे आकारत अवाजवी रक्कम उकळली आहे़ रुग्णवाहिकेचे शासकीय दर 5 रुपये प्रतिकिलोमिटर प्रमाणे असताना या संस्थेने दुप्पट भाडे आकारून रुग्णांची लूट केली असल्याची तक्रार नगरसेविका करूणा कांबळे यांनी आरोग्य उपसंचालकाकडे केली आहे.
फौजदारी कारवाई करण्याची मागणी
शासकीय रुग्णवाहिकेचा मेडिकल असोसिएशनने खासगी वापर करून गोरगरीब जनतेची लुट केली आहे़ यासंबधी रुग्णवाहिकेची कागदपत्रे व लॉगबुकची चौकशी करून पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.