आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांचा विदर्भ दौरा रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीयअध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत विदर्भात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. महायुतीवर निर्माण झालेल्या संकटामुळे शहा यांचा विदर्भ दौराच रद्द करण्याची वेळ भाजपवर आली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा शुक्रवार, १९ सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम विदर्भात अमरावती येथे आणि पूर्व विदर्भात गोंदिया येथे कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्याची योजना भाजपने आखली होती. त्यासाठी दोन्ही ठिकाणी जोरदार तयारीही सुरू झाली होती.

सोमवारपासूनमहायुतीवर घोंगावत असलेल्या संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना विदर्भ दौरा रद्द करावा लागला आहे. शहा यांचा दौरा रद्द होण्याचे कुठलेही अधिकृत कारण भाजपकडून देण्यात आलेले नाही. मात्र, महायुतीवरील संकटामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. शहा यांचा दौरा रद्द झाल्याने विदर्भातील मेळावे होणार की नाही, याबाबतही अनिश्चिततेचे वातावरण आहे. कारण महायुतीच्या रखडलेल्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष फडणवीस हे मुंबईतच तळ ठोकून राहणार असल्याने मेळावे रद्द होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.