आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : चांदुरी मैदानाला सचिनचे नाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरापासून सुमारे सात कि.मी. अंतरावरील आकोलीच्या पुढे चांदुरी येथील 18 एकर जागेवर व्हीसीएच्या मदतीने उभारण्यात आलेली क्रिकेट खेळपट्टी अन् स्टेडियमला सचिन तेंडुलकरचे नाव देणार असल्याची घोषणा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्र्मशी प्रभाकरराव वैद्य यांनी तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याच्या आनंदात केली.
तेंडुलकर हा महान खेळाडू असून, तो नेहमीच जमिनीवर राहिला. यश, पैसा, प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात कधीही शिरली नाही. त्याने कधीही क्रिकेटमध्ये शिखरावर असल्याचा अभिमान बाळगला नाही. सतत 25 वर्षे क्रिकेटची अव्याहतपणे सेवा करून त्याने तंदुरुस्ती जपली. तो नेहमीच वादापासून दूर राहिला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याने बॅटनेच दिले. असा सभ्य मनुष्य व खेळाडू सर्वांचा आदर्श असून, युवा खेळाडूंना त्याची कामगिरी व संस्कार सदैव स्मरणात राहावे, हाच निर्माणाधीन स्टेडियमला सचिनचे नाव देण्याचा मुख्य उद्देश असल्याची भावना वैद्य यांनी व्यक्त केली.
सचिन हा विक्रमादित्य असून, तो निवृत्त झाला तरी त्याचे विक्रम सर्वांना वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहतील. तो क्रिकेटचा देव असल्यामुळे त्याची पूजा होत राहील. त्याच्या खेळाचे पोवाडे गायले जातील, असे भावनिक मनोगतही वैद्य यांनी व्यक्त केले.

‘एचव्हीपीएम’चे सचिनला शताब्दी वर्षात आमंत्रित करण्याचे प्रयत्न
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत असून, यानिमित्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी मंडळाच्या सचिव प्रा. माधुरी चेंडके यांनी याआधी ग्लोबल कॉन्फरन्सकरिता आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्या वेळी अतिशय व्यस्त असल्यामुळे सचिन येऊ शकला नाही. मात्र, या वेळी त्याला गंभीरपणे शहरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्त क्रिकेटचा महानायक प्रथमच अंबानगरीत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याआधी कपिल देव, धनराज पिल्ले, संदीप पाटील, संजय मांजरेकर, प्रशांत वैद्य, सुब्रतो बॅनर्जी, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक नील डिकोस्टा यांनी ‘एचव्हीपीएम’ला भेट दिली आहे.