आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Social Justice Department, Hostel

वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते निकृष्ट जेवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील शहरातील विविध वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात आहे. बुधवार, 26 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या वसतिगृहांमध्ये नियम मोडले जात असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने वसतिगृह संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष संतोष सोनोने, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख रणजित राठोड, शहराध्यक्ष ललित यावलकर, कामगार सेना संघटक सौरभ भगत, माजी तालुका अध्यक्ष विजय बोचरे, महानगर उपाध्यक्ष तुषार भिरड, मनोहर राठोड, रोहन अग्रवाल, चंद्रकांत झटाले, अविनाश भोकरे आदी युवा कार्यकर्त्यांनी शहरातील गोकुळ कॉलनीतील श्रीनाथ वसतिगृह, डॉ. विजय दुतोंडे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, देवकाबाई देशमुख मागासवर्गीय वसतिगृह व गोरक्षण रोडवरील दत्त कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे होते.


वाकडे यांनी वसतिगृहातील खाद्यपदार्थांची पाहणी करत नमुने घेतले. त्यामुळे वसतिगृह संचालकांना ऑनस्पॉट कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे आढळले. गाद्या, चादरींचा तुटवडा आढळला. गहू, तांदूळ, डाळींमध्ये पोरकिडे आढळले. शासनामार्फत लाखो रुपयांचे अनुदान घेणार्‍या वसतिगृह संचालकांनी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले.


तपासणी अहवाल तयार
वसतिगृहातील सर्व असुविधांचा तपासणी अहवाल तयार करण्यात आला आहे. याची माहिती वरिष्ठांना देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.’’ रावसाहेब वाकडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला.


या वसतिगृहांची केली तपासणी
0 श्रीनाथ वसतिगृह, गोकुळ कॉलनी
0 डॉ. विजय दुतोंडे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, गोकुळ कॉलनी
0 देवकाबाई देशमुख मागासवर्गीय वसतिगृह, गोकुळ कॉलनी
0 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, दत्त कॉलनी


समाजकल्याण विभागाचा कानाडोळा
शहरातील वसतिगृहांमध्ये दुरवस्था असताना जिल्हा समाजकल्याण अधिकारी व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

निकृष्ट अन्न आढळले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे आढळले. गव्हात सोंडे आढळले. बुधवारी तयार केलेल्या जेवणाचा दर्जा सुमार होता. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

तीन वसतिगृहांसाठी एकच ‘मेस’
गोकुळ कॉलनीतील श्रीनाथ वसतिगृह, डॉ. विजय दुतोंडे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, देवकाबाई देशमुख मागासवर्गीय वसतिगृह या तीन वसतिगृहांसाठी एकच मेस असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. प्रत्येक वसतिगृहासाठी स्वतंत्र मेस बंधनकारक आहे. मात्र, या ठिकाणी तिन्ही वसतिगृहांच्या मेससाठी एकाच कंत्राटदाराला कंत्राट दिल्याचे आढळले.