अकोला- विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत शुक्रवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शाळेवरील टिन उडून त्याच शाळेचा शिपाई आणि वरवट बकाल-शेगाव मार्गावर ऑटोरिक्षावर झाड पडल्यामुळे एक महिला ठार झाली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले. मलकापूर येथे चार घरे पडून दोघे जखमी झाले. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील शेतात झोपडीवर झाड पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, महान मध्ये गारपीट झाली. तर पातूर, मूर्तिजापूर, बार्शिटाकळी आणि अकोट तालुक्यात वाऱ्यासह पाऊस झाला.
बुलडाणाजिल्ह्यातील चार तालुक्यांत पडल्या गारा :जिल्ह्यात ११ एप्रिलला दुपारी च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी वारा, गारपीट पावसादरम्यान दोन जण ठार झाले असून, सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार मलकापूर शहरातील गांधीनगरात चार घरे कोसळली आहेत. यामध्ये मलकापूर येथील कमला नेहरू उर्दू डीएड कॉलेजचा शिपाई हा शाळेवरील उडालेला टिन लागल्याने जागीच ठार झाला आहे. त्याचे नाव शेख हुसैन शेख गयास असे आहे. दरम्यान, वरवट बकाल-शेगाव मार्गावर वादळी पावसादरम्यान बाभळीचे झाड धावत्या अॅ टोरिक्षावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत फरजाना बी शेख रहीम (रा. अडगाव, ता. अकोट) ही महिला ठार झाली आहे.
दरम्यान, अॉटोरिक्षामधील अलका विष्णू राऊत (पातुर्डा (५०), मंगला महेश राऊत, वैष्णवी उकर्डा सोनुने (१४, खापरखेडा), शेख खालीक शेख हारुण (३०, रा. पातुर्डा) आणि दोन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. जखमींवर वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर शेगाव येथे त्यांना हलवले आहे. दुसरीकडे मलकापूरमध्ये गांधीनगरात चार घरे या वादळी पावसादरम्यान कोसळली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यात ११ एप्रिलला सर्वदूर वादळी पाऊस होऊन काही भागांत गारपीटही झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी घरावरील टिनपत्रेही उडाली आहेत.
यवतमाळात वादळवा-यासह पाऊस-
यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील दारव्हा, पुसद, नेर, राळेगाव, उमरखेड, महागाव अादी तालुक्यांमध्ये दुपारनंतर वादळवारे सुटून हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. त्यात दिग्रस, दारव्हा येथे रात्रीपासूनच पाऊस सुरू हाेता. वादळासह विजांचा कडकडाटही सुरू हाेता. वादळामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. या वेळी अनेकांना बाहेर पडण्यासाठी रेनकाेट, छत्र्यांचा अाधार घ्यावा लागला. शुक्रवारी उमरखेड तालुक्यात जाेरदार पाऊस झाला. करंजी, काेपरा, बाेरी अादी गावांमध्ये हा पाऊस झाला. अाजही अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस झाला. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले अाहे.
वाशीम जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यासह पावसाची हजेरी
वाशीम शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास धुवाधार पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या पावसाने बळीराजासह नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशीमसह कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. ग्रामीण भागात अनसिंग, किन्हीराजा, शेलूबाजार, मेडशी येथे पाऊस झाला आहे. काही भागांत वादळ होऊन विजांचा कडकडाटही झाला. अनसिंग येथे काही घरांवरील टिनपत्रे उडाली, तसेच वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली. जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त रात्री उशिरापर्यंत हाती आले नव्हते.